Thursday, 8 November 2012

न्युनगंड, गोंधळ आणि विद्रोह


     हिंदू धर्मात ब्राह्मण हा सर्वात सुशिक्षित, सुसंस्कारीत वर्ग मानला जातो, तसा तो आहे ही. परंतू, गत काही काळापासून ब्राह्मण वर्गातील संस्कारमुल्ये मोठ्या प्रमाणावर ढासळत असलेले आढळते आहे. पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करत केलेले पेहराव, वाढती व्यसनाधिनता, स्वैर वागणुक, बेधुंद जीवनशैली या समस्यांचा सामना मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण करीत आहे. या समस्येची चिंता ब्राह्मणांना तर आहेच, पण ब्राह्मणेतर वर्ग नेमके याच मुद्यांचा वापर करीत ब्राह्मणांना कोंडीत पकडत असतो, टिका करीत असतो. काही समाजद्रोही याचा लाभ घेत समाजात ब्राह्मणव्देष पसरवताना आढळतात. असंघटित ब्राह्मण हे सर्व मुकपणे, अगतिकपणे सहन करीत आहे. शतका- दिड शतकांपूर्वी समाजात सर्वोच्च आदराचे स्थान असलेला ब्राह्मण, प्रखर बुध्दीमत्तेचे प्रतिक मानला जात असलेला ब्राह्मण, सद्यस्थितीत अगतिक का बनला ? ब्राह्मणेतरांचे वैचारिक हल्ले का निमुटपणे सहन करतो आहे ? एके काळी राजापेक्षाही जास्त मान असलेला ब्राह्मण, आज सरकारी यंत्रणेकडुन उपेक्षित वागणुक का अनुभवतो आहे ? कारण एकच, ब्राह्मण असंघटित आहे. ब्राह्मण असंघटित असण्याचे महत्वाचे कारण ब्राह्मणांमधे असलेला ब्राह्मणत्वाचा न्युनगंड. स्वतःच्या जातीबद्दल असणारा हा प्रचंड न्युनगंड आजच्या परिस्थितीला कारणीभूत आहे. ‘‘मी ब्राह्मण आहे’’ हे मोठ्यानी चारचौघात बोलायलादेखील आज ब्राह्मणांना लाज वाटते. आपली जात स्विकारणे, त्यांना संकुचितपणा वाटतो. जी जात सरकारनी आपली राजमोहोर उठवुन अधोरेखित केली आहे, जी जात सरकार, गरज असो वा नसो, पण प्रत्येक कागदपत्रात आपल्याकडुन नमुद करून घेत असते, तीच जात सांगायला मात्र ब्राह्मणांना संकोच वाटतो, लाज वाटते. आपली जातीचा उच्चरवानी उल्लेख करायला त्याचे मन धजावत नाही कारण ‘‘मी ब्राह्मण आहे’’ याचा प्रचंड न्युनगंड आहे. ही स्थिती का यावी ? याचा मागोवा घेताना, ब्रिटीशांच्या आगमनाच्या काळापासून विचार करावा लागेल.
     ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटिशांनी हिंदुस्थानात शिरकाव केला. ब्रिटिशांची धुर्त आणि चाणाक्ष नजर हिंदुस्थानातील सर्व स्थिती न्याहाळत होती, त्याचे विश्लेषण केले जात होते. हिंदुस्थान गिळंकृत करण्याच्या आपल्या ध्येयावर त्यांची टप्प्याटप्प्यानी काळजीपूर्वक वाटचाल सुरू होती. हिंदुस्थानचा राजकीय, सामाजिक तसेच भौगोलिक अभ्यास करताना धुर्त ब्रिटिशांनी एक बाब नेमकी हेरली. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असा चौफेर पसरलेल्या या विस्तिर्ण प्रदेशात वेगवेगळे राजे राज्य करीत आहेत. प्रत्येक प्रदेशाच्या चालीरिती, परंपरा, भाषा, खाद्य वेगवेगळे असूनही एक समान धागा आहे तो म्हणजे यांचा हिंदु धर्म. हिंदु धर्म या प्रदेशात अतिशय घट्टपणे रोवला गेला आहे आणि या धर्मात ब्राह्मण वर्गाला अतिशय सन्मानाचे स्थान आहे. राजापेक्षा जास्त मान हा राजपुरोहितांना आहे. कावेबाज ब्रिटिशांनी पुर्णपणे ओळखले की, या देशात जर शिरकाव करायचा असेल तर ही एकजुटतेची अभेद्य भिंत उध्वस्त करणे अत्यावश्यक आहे. आपली जगप्रसिध्द (?) ‘फोडा आणि झोडा’ ही कुटनिती वापरून त्यांनी ब्राह्मण वर्गाला लक्ष्य केले. सर्वप्रथम त्यांनी वेद- पुराणे यांच्या सत्यतेविषयी जनमानस कलुषित केले. वेदांना वैज्ञानिक आधार नाही, हे थोतांड आहे हे जनतेच्या मनावर बिंबवुन त्याविषयी संभ्रमाचे वातावरण तयार केले. स्पृश्य-अस्पृश्य भेद हा ब्राह्मणांनी सुरू केला, ब्राह्मण हे ब्राह्मणेतरांना विद्यादान करीत नाहीत, स्त्री शिक्षणाला ब्राह्मणांचा विरोध आहे, इत्यादी. अशा बिनबुडाचे आरोप करीत त्यांनी ब्राह्मण-ब्राह्मणेतर फूट पाडण्यात यश मिळवले. वास्तविक, ब्रिटीश अधिकार्‍यांनी (सर थॉमस मन्रो, मद्रास आणि डब्लु. ऍडम्स्, बंगाल) सादर केलेल्या 1822 -25 या अहवालात स्पष्टपणे नमुद केले आहे की, हिंदुस्थानातील साक्षरता 90.09 टक्के इतकी प्रचंड असून यात सर्व समाज घटकांचा समावेश आहे. यात शुद्रांची टक्केवारी 45 टक्के इतकी स्प्ष्टपणे नमुद करण्यात आलेली आहे. 95 टक्के खेड्यांमधे शाळा आहेत, हे पण आर्वजुन नमुद केलेले आहे. ही वास्तविकता असताना केवळ ब्राह्मणांना इतर समाजापासून तोडण्याकरीता ब्रिटिशांनी केलेला बुध्दीभेद, दुर्दैवानी आज मात्र सर्वमान्य झाला आहे. शिवछत्रपतींच्या सैन्यात जशा अठरा पगड जातींचा समावेश होता, तसाच पेशव्यांच्या सैन्यात देखील होता. जुने वाङ्मय बघितले तर जात्यावरची गाणी, भुलाबाईची गाणी, ओव्या असे असंख्य काव्यप्रकार हे महिलांनी केलेले आढळते. ते काय शिक्षण न घेताच ? काही बखरीत उल्लेख आढळतो की, सरदार स्त्रिया या दफ्तराचे हिशेब ठेवीत. ते काय शिक्षणाशिवाय ? ब्रिटिशांच्या आगमनाच्या काळात असलेले 90.09 टक्के असलेले साक्षरतेचे प्रमाण, ब्रिटिश गेले त्यावेळी 19 टक्के इतके खालावले होते. मग या निरक्षरतेला जबाबदार कोण ? ब्रिटिश की ब्राह्मण ? लॉर्ड मॅकोलेने या सर्व बाबी आपल्या शैक्षणिक धोरणातून अशा आक्रमकपणे हिंदुस्थानातील समाजमनावर बिंबवल्या की, सुशिक्षित ब्राह्मण ही तेच सत्य मानु लागला. वारंवार तेच तेच बिंबवल्यामुळे ब्राह्मणेतर समाज ब्राह्मणांना आपला शत्रु मानु लागला.
     कालांतराने, ब्रिटीश राजवट स्थिरावल्यानंतर हिंदुस्थानात सामाजिक सुधारणेचे वारे वाहु लागले. अनिष्ट रूढी परंपरा यांच्या विरोधात प्रचंड चळवळ उभी राहु लागली. पण, दुर्दैवानी ही चळवळ, रूढी परंपरा विरोधी न राहता ब्राह्मणविरोधी होऊ लागली. या अनिष्ट रूढी परंपरांचा आडोसा घेत ब्राह्मणांना लक्ष्य केले जाऊ लागले. ब्राह्मण विरूध्द ब्राह्मणेतर वाद वाढु लागला. ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांच्यात दरी वाढत गेली, ब्राह्मणांविषयी ब्राह्मणेतर समाजात असंतोष खदखदु लागला. ब्रिटिश कुटनिती यशस्वी झाली. गांधी हत्येनंतर या असंषोतानी उग्र रूप धारण केले. असंख्य ब्राह्मण मारले गेले, लुटले गेले, देशोधडीला लागले. ग्रामीण भागातून तर ब्राह्मण हद्दपारच झाला. मुळातच शांत, सहनशील असणारा ब्राह्मण यातूनही सावरला व पून्हा एकदा सुस्थितीत येवु लागला. ‘आपण बरे नी आपले काम बरे’, या मार्गाने जगु लागला. या सर्व पार्श्वभूमीवर ब्राह्मणांच्या मानसिकतेमधे निर्माण झाला ‘‘आपण ब्राह्मण आहोत’’ याचा न्युनगंड. आणि याच न्युनगंडातून निर्माण झाला तो ‘‘संस्कारांचा गोंधळ’’.
     वैदिक परंपरेचा वारसा लाभलेला ब्राह्मण वर्ग मुळात शांत स्वभावाचा आहे. आक्रमकता असते ती केवळ बौध्दिक वाद विवादात. सोशीक, सहनशील असलेला हा वर्ग सामाजिकदृष्ट्या माघारला गेल्यानंतर याच्यात एक प्रकारची भयाची भावना निर्माण झाली. घरातून संस्कार मिळत असतात, कोणाला मारू नये, कोणी आपली खोड काढली तर त्याची समजूत काढावी वा त्याकडे र्दुलक्ष्य करावे, कोणाशी उध्द्दटपणे बोलु नये, सर्वांचा योग्य तो मान ठेवावा. परंतू, या संस्कारांना ब्राह्मणेतर समाज घाबरटपणा समजू लागला. ब्राह्मणांची कितीही टिंगलटवाळी केली तरी आपले काही बिघडत नाही, या मग्रुरीतून ब्राह्मणांना त्रास देण्याचे प्रकार वाढले. शाळेतील मुलांना अशा टवाळखोरी तोंड देणे नित्याची बाब बनली. एकीकडे ‘‘ए बामना’’, ‘‘ए कढीभात’’ अशी संभावना सहन करावी लागते, तर दुसरीकडे घरातील संस्कार यांना प्रत्युत्तर देण्यास नाकारते, अशा कैचीत ब्राह्मण सापडला. कालौघातील बदलते सामाजिक, आर्थिक बदलही लक्षात घ्यावे लागतील. गांधी हत्येनंतर ब्राह्मण बहुतांश शहरात स्थिरावला. मुख्यतः नोकरी हेच उत्पनाचे साधन. शहरांमधून राहताना हळुहळु उंचावत जाणारे जीवनमान, बदलती जीवनशैली, त्यातून जागेची अडचण अशा समस्यांमूळे एकत्र कुटुंब विभक्त होवु लागली. अपूरे उत्पन्न, वाढती महागाई, स्पर्धात्मक जीवन व त्याला तोंड देण्यासाठी मुलांना द्यावे लागणारे महागडे शिक्षण यामुळे नवरा-बायको या दोघांनाही नोकरी करणे भाग पडते. मुलांचे व्यवस्थित संगोपन व्हावे या उद्देशानी काटेकोरपणे केलेले कुटुंब नियोजन, विभक्त कुटुंब यामुळे मुलांना ऐकटेपणा यायला लागला. दिवसभर शैक्षणिक मारा तर संध्याकाळी संस्कार वर्ग, छंद वर्ग यातच तो गुरफटला गेला. मित्र मंडळात जाणे, एखाद्या मंडळाचा सभासद होणे, काही सामाजिक कार्यक्रमात सहभागी होणे, याला पालक आक्षेप घेतात. मुलगा बिघडेल, तो बाहेर मारामारी करेल, अशा असंख्य समजूतीमधून पालक मुलांना घरातच गुंतवून ठेवतात. ना मित्र, ना बहीण भाऊ, असे मुलं आपल्याच कोशात गुंतत जातात. एक अथवा दोन अपत्ये असल्यामुळे त्यांचे सर्व लाड पूर्ण करणे, म्हणजे आपले कर्तव्य आहे या (गैर) समजूतीतून पालक मुलांचे सर्व हट्ट पूर्ण करीत असतात. मुलांना तडजोड या प्रकाराची ओळखच होत नाही. तसेच, घरात वडीलधारी मंडळी नसल्यामुळे आपोआप होणार संस्कार मिळणे थांबले. मुलांच्या आर्थिक गरजा पूर्ण केल्यानी आपले कर्तव्य संपले, या समाधानात पालक राहू लागले. घरातील एकटेपणा, पुरवले जाणारे सर्व हट्ट, त्यामुळे तडजोड करण्याची मानसिकता नसलेला हा मुलगा / मुलगी तरूणपणी बाहेरील जगात प्रवेश करतो त्यावेळी त्याच्यात बाहेरील जगाशी संघर्ष करण्याची करण्याचा मानसिक कणखरपणा नसतो, तर मनात असतात ते घरात पालकांनी दिलेले संस्कारांचे अर्धवट धडे, तसेच, मी म्हणेन ते होईलच ही ठाम (?) समजूत. पण बाहेरील परिस्थिती काय असते ?
     गांधी हत्येनंतर पराकोटीला गेलेला ब्राह्मणव्देष काही प्रमाणात निवळला गेला. जातीपातीच्या सीमारेषा धूसर होत होत्या, जातीय व्देष निवळत होता. त्याच काळात व्हि.पी.सिंह यांनी भारतीय जनता पक्षाच्या हिंदु कार्डला धक्का देण्यासाठी भयंकर राजकीय खेळी खेळली. मंडल आयोग अहवालाचे जवळपास विस्मृतीत गेलेले प्रकरण त्यांनी पक्षीय, राजकीय स्वार्थासाठी पुन्हा उकरून काढले. आरक्षणाच्या मुद्यावरून जातीपातींमधील व्देषाचे भूत हिंदुस्थानी जनतेच्या मानगुटीवर पुन्हा  एकदा बसवले. विसरत चाललेल्या जातींच्या अस्मिता (?) पुन्हा जागृत झाल्या. आणि सुरू झाला जातींच्या राजकारणाचे भयानक पर्व. तारूण्यापर्यंत घरातल्या सुरक्षित वातावरणात वाढलेला ब्राह्मण तरूण या बाहेरील परिस्थितीबद्दल अनभिज्ञ होता. सवर्ण म्हणुन सरकारी नोकरीची शक्यताच नाही, खाजगी कंपनीत प्रचंड स्पर्धा, जातींचे लॉबींग, तसेच आपआपल्या प्रदेशातील लोकांना नोकरी मिळावी म्हणुन होणारे प्रांतीय लॉबींग, यात हा युवक पार गोंधळला., गडबडला. कधी शिक्षणाची संधी आपल्या जातीमुळे गमावावी लागली तर कधी नोकरीची संधी आपल्या जातीमुळे गमावली. त्यातच वरून इतरांचे स्वतःच्या जातीबद्दल टोमणे सहन करावे लागले. ही अवहेलना सहन ही होत नाही आणि घरातील संस्कारांमुळे याला प्रतिवादही करता येत नाही. ‘मुलगा बिघडला’ हा शिक्का बसण्याची भिती. या घुसमटीतून बाहेर निघायचे कसे ? एकच मार्ग, विद्रोह ! ‘‘मी ब्राह्मण नाही’’ हेच सिध्द करायचे. पण कसे ? खुपच सोपा मार्ग म्हणजे जे जे म्हणुन ब्राह्मणांना निषिध्द मानले आहे, त्याचाच स्विकार करायचा. आपोआप मी ब्राह्मण नाही हे सिध्द होईल, या गैरसमजुतीमधून तो मांसाहार, धुम्रपान, मद्यपान करू लागतो. स्वतःचे ब्राह्मणत्व नाकारण्याचा हा मार्ग निश्चितच चुकीचा आहे. परंतू, बालपणापासून त्याच्यासमोर संस्कारांचा भलामोठा बागुलबुवा उभा केला जातो. तो त्याच्याशी, समाजातील त्या उलट असणार्‍या परिश्थितीशी लढु शकत नाही, त्यामुळे त्यानी शोधून काढलेली ही पळवाट असते.
     सद्यस्थितीत या संस्कारांचा डोळसपणे विचार करण्याची आवश्यकता आहे.   दिवसभर शाळा, वेगवेगळे क्लासेस, छंद वर्ग यातून वेळ काढून मुलांना, इतर मुलांमधे मिसळण्याकरीता, लहान मोठ्या सार्वजनिक कायक्रमांमधे सहभागी होण्यास, समाजभिमुख होण्यास प्रोत्साहन द्यावे. मुलांना वैचारिक स्वातंत्र्य द्यावे (अर्थातच अतिरेक होणार नाही याची काळजी नक्कीच घ्यावी). मुलांमधे आक्रमता निर्माण व्हावी या दृष्टीने प्रयत्न करावेत. कोणी टिंगल टवाळी केली तर दुर्लक्ष कर, सरळ घरी ये, असे सल्ले न देता, मुलांना अशा परिस्थितीचा सामना कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करावे. मुलांच्या शारिरिक वाढीबद्दल जसे पालक आग्रही असतात, तसेच त्यांनी मुलांमधे मानसिक कणखरता निर्माण करण्यावर देखील भर द्यावा. वडीलधार्‍या मंडळींना, शिक्षकांना उलट उत्तर देणे चुकीचे परंतू ‘अरे’ ला ‘कारे’ नी उत्तर दिलेच पाहीजे. सुसंस्कारित म्हणजे भ्याडपणा नाही. तसेच, आक्रमकता म्हणजे वाया जाणे ही नाही, हे आधी पालकांनी समजून घेतले पाहीजे. ‘ठोशास ठोसा’ ही वृत्ती मुलांमधे आली तरच ते पुढील आयुष्याततील आव्हानांना सामना सक्षमपणे करू शकतील, ही वास्तविकता पालकांनी ध्यानात घ्यावी. आपण जन्मजात ब्राह्मण आहोत, ही जात कायमच आपल्याशी जोडल्या गेली आहे, त्यामुळे मांसाहार, धुम्रपान, मद्यपान करून तुम्ही ही जात नाकारू शकत नाही, तर उलट तुमचेच नुकसान करून घेता आहात, हे मुलांना पटवुन द्यावे. ब्राह्मणांवर होणार्‍या बिनबुडाच्या आरोपांना उत्तर देण्याकरीता मुलांनी अधिकाधिक वाचन करावे, यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे.
     प्रत्येक ब्राह्मण व्यक्तीने एक अत्यंत महत्वाची बाब ध्यानात घ्यावी. आपण ब्राह्मण म्हणुन जन्म घेतला आहे. ही जात आपल्या जन्मानंतर सातच दिवसात सरकारी कागदपत्रात नोंदल्या गेली आहे. शाळा, कॉलेज, नोकरीचे ठिकाण अशा सर्वच ठिकाणी आपल्याला याची नोंद करावी लागते. इतकेच काय तर, बँकेतून कर्ज घेतानाही जातीची नोंद करावी लागते. सरकार वेगवेगळ्या कागदपत्रांमधून त्याची जाणीव करून देत असतेच. तुमचे आडनावसुध्दा तुमच्या जातीची ओळख देत असते. त्यामुळे, जात नाकारणे वा जात नाकारण्यासाठी चुकीचे मार्ग अवलंबणे असे घातक उपाय (?) करण्यापेक्षा संघटितपणे, सक्षमपणे याचा मुकाबला करणे, हाच ऐकमेव मार्ग आहे. हे आपण स्वतः समजुन घेणे व आपल्या पुढील पिढीला देखील समजावुन सांगणे, हा या समस्येवरील उपाय आहे. आपल्या संस्कारांचा योग्य अर्थ समजुन घेणे व तो मुलांना समजावुन सांगणे, त्यांच्या मनात बिंबविणे, हे आजच्या पालकांपुढील आव्हान तसेच कर्तव्य देखील आहे. आपल्यातीलच काही लोक ब्राह्मण समाज संघटित होणे, त्यात विधायक बदल होणे, याला ‘’जातीय’’ मानतात. त्यातच जर हिंदुत्वाची जोड मिळाली की यांना अजुनच जोर येतो. परंतू, खरंच हे जातीय आहे ? माझ्यामते अजिबात नाही. कारण, जर माझ्या मुलांनी योग्य वागणुक ठेवावी अशी मी अपेक्षा करत असेन तर आधी मला स्वतःला माझी वागणुक तशी ठेवावी लागेल. त्यावेळेस माझे मुलं तसे वागतील. माझे मुलं योग्य वागत असतील तर मी दुसर्‍या मुलांना त्यांच्या वागणुकीबद्दल बोलु शकेन. तसेच, जर माझा समाज योग्य वागत असेल तर मी इतरांना तसे वागण्याचा सल्ला देवु शकेन वा सुचना करू शकेन. मग जर मी माझ्या समाजात सकारत्मक बदल व्हावेत यासाठी प्रयत्न करत असेन तर ते संकुचित कसे ठरेल ? याला जर संकुचितपणा मानला तर मी माझ्या मुलांना योग्य वळण लावले, तेसुध्द्दा संकुचितपणाच ठरेल. संपूर्ण हिंदु धर्मात चैतन्य निर्माण करायचे असेल तर आपल्याला आधी आपला समाज योग्य मार्गावर आणावा लागेल. आपला समाज योग्य मार्गावर असेल तरच दुसर्‍यांना धडे देण्याचा आपल्याला नैतिक अधिकार आहे. आज असा नैतिक अधिकार आपल्याला आहे असे वाटते का ? आणि जर नाही वाटत, तर मग या प्रयत्नांना जातीय, संकुचितपणा हे कोणत्या दृष्टिकोनातुन म्हटले जावे ? सद्यस्थितीत, देशहिताकरीता ‘ब्राह्मण संघटित’’ होणे अत्यावश्यक आहे. नव्हे, ते आपले राष्ट्रीय कर्तव्यच आहे. आपल्या संस्कारांचा, बुध्दीमत्तेचा व्यापक देशहिताकरीता कसा उपयोग करता येईल या दृष्टीकोनातून विचार व्हावा, हीच अपेक्षा.

     

Monday, 20 August 2012

ब्राह्मणत्वाचा न्युनगंड

ब्राह्मण आणि हिंदुत्व यावर अनेकांचा संभ्रम आहे. ब्राह्मणत्व हा शब्द आला की सरळ सोपा अर्थ काढल्या जातो की जो कर्माने ब्राह्मण असेल तो ब्राह्मण. ''आम्ही ब्राह्मणत्व कधीच सोडले आहे,'' असे म्हटल्या जाते. पण, यात कितपत तथ्य आहे ? आपण मातेच्या गर्भात अंकुरतो त्याच वेळी ब्राह्मण ही ''जात'' आपल्या नावामागे चिकटते. मुल जन्माला आल्यानंतर सात दिवसातच तयार झालेल्या जन्म दाखल्यात त्या बाळाची जात ''ब्राह्मण'' लिहील्या जाते. मग ते मुल मोठे झाल्यावर आपले ब्राह्मणत्व टिकवणार की नाही याची कोणीही चिंता करीत नसतो. मग आता मोठा झाल्यावर कशाला हा खटाटोप ? चांगले मार्क्स मिळवुनही ज्यावेळी प्रवेश नाकारला जातो तो त्या विद्यार्थ्याची जात बघुन न की तो ब्राह्मणत्व पाळतो अथवा नाही हे तपासून, एखाद्या लायक कर्मचार्‍याला तो ब्राह्मण म्हणुन पदोन्नती नाकारली जाते, ते त्याची जात बघुन, न की तो ब्राह्मणत्व पाळतो अथवा नाही, याची खातरजमा करुन. ''ब्राह्मणांची सरसकट कत्तल करा'' असे फर्मान निघते त्यावेळी कोणी जर ब्राह्मणत्व पाळत नसेल त्याला सोडुन द्या, असे म्हटले जात नाही. तुमचे आडनाव हीच तुमच्या जात दर्शवत असते, मग विनाकारण वारंवार ''ब्राह्मणत्वाचा'' मुद्द्दा का काढला जातो ?
कदाचित, हे दडपणच आजच्या र्‍हासाला कारणीभूत असावे. ब्राह्मण म्हणुन ज्या वेळी उपहासाचा सामना करावा लागतो, कुचेष्टा सहन करावी लागते, त्या वेळी मी ब्राह्मण म्हणुन का जन्माला आलो ? असा सवाल मुलांपुढे उभा राहतो. ज्यावेळी ब्राह्मण असल्यामुळे उपेक्षा सहन करावी लागते, अवहेलना सहन करावी लागते, त्यावेळी संताप होत असतो पण व्यक्त करता येत नाही. या मानसिक कोंडीतून बाहेर पडण्याकरीता मग ब्राह्मण तरूण मग चुकीचा मार्ग अवलंबतो. सिगरेट ओढणे, दारू पिणे, मांसाहार करणे, गुंडगिरी करणे हे प्रकार सुरू होतात कारण त्याला आपले जन्मजात ब्राह्मणत्व नाकारायचे असते. मार्ग जरी चुकीचा असला तरी या त्याला मार्गावर यायला कोण प्रवृत्त करतो ? याचा कधी विचार केला का ? ब्राह्मण म्हणुन उपेक्षा सहन करण्यापेक्षा तो ब्राह्मणत्व नाकारण्याचा चुकीचा पण सोपा मार्ग निवडतो. आपल्यावरचा ''ब्राह्मण'' हा शिक्का पुसायला तो अनेक धडपडी करू लागतो. आपण कितीही कंठशोष केला की, ब्राह्मणत्व पाळतो तो ब्राह्मण, जो जन्माने आहे पण कर्माने ब्राह्मण नव्हे, हे समाजात कितपत मान्यताप्राप्त आहे ? अजुनही आपले आडनाव हीच आपली, पर्यायानी आपल्या जातीची ओळख असते. याचे भान आपल्याला कधी येणार ?
राहीला मुद्दा हिंदुत्वाचा. आम्ही हिंदुस्थानी आहोत, हिंदु आहोत, हे नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. हिंदु आहोत म्हणुन ब्राह्मण आहोत, हे पुर्णपणे मान्य आहे. परंतू, सद्यस्थितीत, हिंदुंमधीलच काही समाजद्रोही, ब्राह्मणविरोधी वातावरण तयार करत असताना किती काळ शांत बसणार ? ब्राह्मणांची सरसकट हत्या करा असे फर्मान निघते, या प्रकारांना राजकीय पाठींबा मिळतो. आणि, अशाही परिस्थितीत हिंदुत्ववादी संघटना ब्राह्मणांना सबुरीचा सल्ला देतात, हे संतापजनक आहे. जातीय विव्देषाच्या या राजकारणात ते आपली हिंदुत्वाची पोळी शेकतात, हे खेदजनक आहे. का म्हणुन फक्त ब्राह्मणांनीच सबुरी दाखवावी ? का म्हणुन जातीय सलोखा राहावा यासाठी फक्त ब्राह्मणांनीच  पुढाकार घ्यावा ? ही मानसिकताही आपण ब्राह्मण असल्याचा आपल्याला न्युनगंड आहे, हेच दर्शवते. आम्ही ब्राह्मण नाही, हे दर्शवण्याच्या चढाओढ सुरू आहे. ''मी ब्राह्मण नाही'' हे दर्शवण्याचा गोंडस मार्ग म्हणजे ''हिंदुत्ववादी'' म्हणवुन घेणे. मी जात-पात मानत नाही. आम्ही सर्व हिंदु आहोत. असे म्हटले की यांना वाटते आपल्यावरचा ब्राह्मण हा शिक्का पुसला जाईल. पण हेच लोक ज्यावेळी काही योजना आखत असतात त्यावेळी कोणत्या भागात कोणत्या जातीसाठी काम केल्याने अधिक लाभ होईल याचा हिशोब मांडत असतात. त्यावेळी कुठे जाते ''हिंदुत्व'' ?  शुद्रांना वेदाभ्यासाचे प्रशिक्षण दिले, अशी जाहीरात करताना का ''शुद्र'' शब्द वापरता ? कारण त्याशिवाय यांच्या कार्याला महानता कशी येणार ? हिंदुत्वाच्या नावाखाली आपला न्युनगंड लपवणे सोडा आणि खुलेपणानी आपले ब्राह्मणत्व स्विकारा.  सद्यस्थितीतील समस्येवर विनाकारण फाटे फोडुन समस्या वाढवण्यापेक्षा या प्रयत्नात सहभागी व्हा, यातुन मार्ग काढायला तुमचाही हातभार लागु द्या. अन्यथा, आज तर तरुण प्‍2ढीत फक्त अगतिकता आहे, त्याचे रूपांतर एकतर उद्रेकात होईल अथवा पुढील पिढी, फक्त जातच नाहीतर धर्म बदलायलाही बाध्य होईल. एकच आवाहन करतो, या समस्येचे गांर्भिय समजुन घ्या आणि या अभियानात सहभागी व्हा.

धन्यवाद !






















Sunday, 19 August 2012

‘‘अभिवादन रॅली’’


अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्यावतीने आज दि. 18 ऑगस्ट 2012 रोजी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या 312 व्या जयंतीनिमित्तानी आयोजित करण्यात आलेली ‘‘अभिवादन रॅली’’ यशस्वीपणे पार पडली.
पर्वती पायथा येथे सकाळी 8.45 वा. श्री. अभिषेक पाठक (कार्यकारी संचालक, एम.पी.ग्रुप) यांच्या शुभहस्ते नारळ फोडुन सदर रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. तरूणांच्या प्रचंड घोषणांनी वातावरण भारावुन गेले. तरूणांबरोबर जेष्ठ नागरिकही उत्साहानी या दुचाकी रॅलीत सहभागी झाले होते. पर्वती पायथा येथून प्रारंभ होवून रॅली बाजीराव रस्त्यानी शनिवार वाड्याच्या दिशेने निघाली. मार्गात ठिकठिकाणी प्रचंड घोषणा देत रॅलीपूढे सरकत होती. शनिवार वाड्याला पूर्ण प्रदक्षिणा घालून रॅलीचे शनिवार वाड्यात आगमन झाले.
शनिवार वाडा येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याला पुण्याच्या महापौर सौ. वैशालीताई बनकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तसेच दिपप्रज्जवल करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.पेशव्यांच्या पराक्रमाने तसेच शनिवार वाडासारख्या वास्तुमुळे पुण्याचा जगभरात नावलौकिक झाला असल्याचे प्रतिपादन मा. महापौरांनी केले.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. गोविंदजी कुलकर्णी यांनी युवकांमधे आपल्या जाज्वल्य इतिहासाप्रति आस्था निर्माण व्हावी, याकरीता अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सदैव प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही दिली. आपल्या प्रमुख भाषणात मा.श्री. मंदारजी लवाटे म्हणाले की, हिंदुस्थानात जो राहतो तो हिंदुस्थानी, याच धोरणातून श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे मोगलांच्या मदतीकरीता दिल्लीला गेले. मोगलांवरील आक्रमण हे हिंदुस्थानवरील आक्रमण आहे, त्यामुळे मोगलांच्या मदतीला जाणे हे आपले कर्तव्यच असल्याचा ठाम निश्चय त्यांनी अंमलात आणला. केवळ उत्तर हिंदुस्थानच नाहीतर थेट इराणपर्यंत त्यांनी मराठी साम्राज्याची दहशत बसवली. यावेळी पेशवे वशंज मा.श्री.उदयसिंहजी पेशवे, श्री.अनिल गानु, नगरसेवक मुक्ताताई टिळक प्रामुख्यानी उपस्थित होते. 
सदर कार्यक्रमाला राजेंद्र कुलकर्णी, अमोघ टेंभेकर, लक्ष्मीकांत धडफळे, अव्दैत देहाडराय, ध्रुव कुलकर्णी, अनिरूध्द जोशी, सुहास पोतदार, जयंत फाटक, अंकित काणे, स्नेहल तोडेवाले, वैभव जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Sunday, 5 August 2012


दि. 18 ऑगस्ट, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती. या महान सेनानीने स्वराज्याचा भगवा अखिल हिंदुस्थानात दिमाखाने फडकत ठेवला. हिंदवी स्वराज्याचे शत्रु ‘‘बाजीराव पेसवा’’ या नावालाच घाबरून होते. अशा या रण धुरंधर, महाप्रतापी, अपराजित सेनानायक, ज्याने आपले अवघे 40 वर्षांचे आयुष्य भगव्या ध्वजाच्या प्रतिष्ठेकरिता पणाला लावले. हिंदुस्थानातील हिंदु धर्म टिकवुन ठेवला. त्याच स्वराज्यात, त्याच पावन भूमीत आज हिंदु धर्म फोडण्याचे, जाती जातीत फूट पाडण्याचे षडयंत्र सुरू आहे.
भांडारकर संस्थेवरील हल्ला, ब्राह्मणांबद्दल हीन दर्जाचे, मानहानीकारक तसेच चिथावणीखोर लिखाण, लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळ काढणे, रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढून विशिष्ट समाजाचा अपमान करण्याचा प्रयत्न, समर्थ रामदास स्वामी व संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल बदनामीकारक लिखाण यासारखे अनेक समाजविघातक कृत्य, हिंदुमधीलच काही समाजद्रोही सातत्यानी करीत आहेत. एकसंध हिंदुत्वाला आव्हान देणार्‍या या समाजशत्रूंना चोख उत्तर देण्याकरीता शनिवार, दि. 18 ऑगस्ट 2012 रोजी ‘‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंती’’ निमित्तानी आयोजित विविध कार्यक्रमांत प्रचंड संख्येनी उपस्थित राहून शनिवार वाडयाच्या साक्षीने अखंड हिंदुत्वासाठी कटिबध्द व्हा.

दि. 17 ऑगस्ट – महाआरती व मानवी साखळी, सायं. 6 वाजता, स्थळ – शनिवार वाडा.              आयोजक – परशुराम प्रतिष्ठान.

दि. 18  ऑगस्ट – ‘‘भव्य अभिवादन दुचाकी रॅली’’, सकाळी 8.30 पर्वती पायथा ते शनिवार वाडा.

आयोजक – ‘‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ’'


पुष्पांजली, सकाळी 9.30 वा. शनिवार वाडा.

  ‘‘पेशवे खजिना शोध स्पर्धा’’ सकाळी 10.00 ते दुपारी 4.00, शनिवार वाडा.
   चर्चासत्र – ‘‘सैन्यदलातील नोकरीची संधी, सायंकाळी  5.00 वाजता, टिळक
           स्मारक सभागृह, टिळक रोड, पुणे. आयोजक – चित्तपावन अस्तित्व, पुणे.

वरील सर्व कार्यक्रमांना समस्त हिंदुंनी प्रचंड संख्येनी उपस्थित राहून हिंदु धर्मात फुट पाडणार्‍या समाजशत्रूंना चोख प्रत्युत्तर द्यावे, ही विनंती.

धन्यवाद !

                                                     

Wednesday, 1 August 2012

संपादकीय - ऑगस्ट 2012


गत काही काळापासून देशाची आर्थिक स्थिती ढासळत आहे. परकीय चलनानी प्रति डॉलरला रू. 57.30 इतकी खालची पातळी गाठली आहे. अजूनही हा दर आणखी खालावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महागाई प्रचंड वाढली आहे, सर्वसामान्य नगरिकाला जीवन जगणे मुश्कील झाले आहे. एकेकाळी या देशात सोन्यात धूर निघत होता, असे म्हटले जाते. खरं बघितले तर, या देशात अजूनही प्रचंड संपत्ती दडली आहे. जरी या देशाची लोकसंख्या आजच्यापेक्षा दुप्पट झाली तरी देखील कोणत्याही प्रकारची टंचाई भासणार नाही. सकस जमीन, उत्तम जमीन, मुबलक पाणी, सर्व प्रकारच्या खनिजांनी संपन्न असलेल्या या सुजलामं, सुफलामं देशात प्रत्येक नागरिक दर्जेदार जीवन जगू शकतो. परंतू, येथील सर्व संपत्ती मुठभर लोकांच्या हातात एकवटली जाते आणि सामान्य जनता महागाईत होरपळते, असे विदारक चित्र दिसते आहे. रू. 75/- प्रति लिटर पेट्रोलचा भाव असताना रू. 27/- इतके उत्पन्न हे दारिद्रयरेषेच्या वर असल्यचा निष्कर्ष काढला जातो. अर्थात, ज्या व्यक्तीचे दररोजचे उत्पन्न रू. 27/- पेक्षा अधिक असेल ती व्यक्ती गरीब नाही, ही अत्यंत हास्यास्पद गोष्ट आहे. या देशातील सर्व संपत्ती केवळ तीन वर्गाकडे संग्रहित होते आहे. 1) राजकारणी, उच्च नोकदार वर्ग. 2) बहु कोटी उद्योजक. 3) मंदिर, मठ, तथाकथित स्वामी मंडळी. श्रीमंत वर्ग अधिक श्रीमंत होतो आहे तर गरीब अधिक गरीब होत आहे. या देशातील नागरीक आध्यात्मिक वृत्तीचा असल्यामुळे मंदिर- मठ- स्वामी या मंडंळी कडे आध्यात्मिक मार्गाने अमाप संपत्ती गोळा होत असते. हा सर्व पैसा जनतेचा असून, त्या त्या आध्यात्मिक संस्थेच्या विकासाकरीता, भक्तांच्या सोई-सुविधांवर खर्च व्हावा असे अपेक्षित असते. हा सर्व निधी काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. या तिन्ही वर्गाकडे असणारी संपत्ती जर सरकारी खजिन्यामध्ये जमा करण्यात आली तर किमान 50 वर्षांची अर्थव्यवस्था उत्तमरितीने चालू शकते. ही सर्व संपत्ती, विदेशातील काळा पैसा, हा सगळा निधी जर देशाच्या विकासाकरीता वापरला तर काय घडू शकेल, याची कल्पना करून बघावी. जर केवळ विशिष्ठ जातीत जन्म झाला म्हणून काहींचे मुलभूत अधिकार कायद्यानी रद्द करता येते, तर मग या धनदांडग्यांची संपत्ती ताब्यात का घेत नाही ? कमाल जमीन धारणेचा कायदा अंमलात आणला गेलाच ना ? मग तोच नियम इथे का लावत नाही ? कारण, निर्णयप्रक्रियेमध्ये याच तीन वर्गाचे प्रतिनिधीत्व असल्यामुळे हे शक्य होत नाही. 100 कोटी रूपयांपेक्षा अधिक संपत्ती असणार्‍या व्यक्ती अथवा कंपनीकडून पारदर्शकपणे सर्व करांचा भरणा होतो कि नाही याची खबरदारी घ्यावी. सर्व मठ, बाबा यांची संपत्ती सरकार जमा करावी. देशातील 99%  संपत्ती  1% लोकांच्या हाती एकवटली आहे. आणि, 10%  संपत्ती 99% जनतेसाठी उपयोगात आणली जाते. हा कसला न्याय ? या स्थितीवर नियंत्रण आणण्याकरीता सर्व आर्थिक कायदे कठोर करून त्यांची प्रभावशाली अंमलबजावणी सरकारने करावी.

Saturday, 3 March 2012

संपादकीय मार्च - 2011

नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निकालांचा आढावा घेताना पुणे महापालिकेतील काही गोष्टी प्रामुख्यानी जाणवतात. जी राष्ट्रवादी कॉंगेस पार्टी, कॉंग्रेस(आय) मधील नेतृत्वाची पोकळी भरुन काढुन एकहाती सत्ता मिळवण्याची दावा करत होती, त्यांना दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरण जड गेले आणि परिपुर्ण यशानी त्यांना हुलकावणी दिली. ज्यांच्या कार्यकाळात हे घडले, ते मोहनसिंह राजपाल सपशेल पराभुत झाले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानी केलेल्या जाहीर आवाहनाला पुणेकरांनी मनापासुन प्रतिसाद देत श्री.राजपाल यांना मोठ्या फरकानी पराभुत केले, त्याबद्द्ल पुणेकरांचे आभार ! सर्वच पक्षांना यातुन योग्य तो संदेश गेलाच असेल. यापुढे ब्राह्मणविरोधी कारस्थाने कराल तर तुम्हालाही घरी बसवु, हा इशाराच मतदारांनी दिला. दुसरी महत्वाची गोष्ट, जे स्वःतला ब्राह्मण नेते मानतात त्यांनाही पराभुत केले. आपण काहीही केले तरी समाज ते मान्यच करेल, हा भ्रमाचा भोपळा फुटला. मतदारांनी ‘‘आपल्याला कोणीही गृहीत धरु नये’’, हाच संदेश यातुन दिला. जे ब्राह्मण नेते घराणेशाही रुजवु पहात होते तर कोणी पक्षविरोधी भुमिका घेत ब्राह्मण मतदारांना गृहीत धरुन आपली वेगळी चुल मांडण्याच्या प्रयत्नात होते त्यांनाही मतदारांनी दणका दिला. या निकालांकडे अनपेक्षित निकाल या दृष्टीकोनातुन न बघता सकारामत्क दृष्टीने बघितले पाहिजे. ब्राह्मण मतदारांनी आपले पुर्वमत बाजुला ठेवत अधिक व्यावहारिकपणे मतदान केले, पण मतदानाची अत्यल्प टक्केवारी मात्र अजुनही चिंतेचा विषय आहे. आपल्या मतानी काय घडु शकते हे आता लक्षात आल्यानंतर आता पुढील काळात मतदानाची टक्केवारी वाढवण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे हे ब्राह्मण मतदारांनी लक्षात घ्यायला हवे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संपुर्ण राज्यात जो भरभरुन पाठींबा मिळाला विशेषःत युवा वर्गाचा, त्यातुन जनतेला बदल हवा आहे, हेच अधोरेखित होते. विद्यमान राजकीय पक्षांमधे मतदारांना काही उणीव भासते आहे, काही तरी कमतरता भासते आहे. ती उणीव, ती कमतरता मनसेच्या माध्यमातुन भरुन निघेल अशी आशा मतदारांना वाटली. आजच्या युवकाला प्रचलित व्यवस्थेविषयी चीड आहे, नाराजी आहे. त्याला बदल हवा आहे. कोणत्याही नेत्यापेक्षा तो बदल घडवुन आणण्याची क्षमता त्याला राज ठाकरेंमधे दिसली, असेच या निकालांवरुन दिसते. तरुण वर्गात जसा ‘मनसे फॅटर’ चालला त्याचप्रमाणे ब्राह्मण मतदारांमधेही चालला. पुणे येथील आपल्या जाहीर भाषणात राज ठाकरेंनी दादोजी पुतळा प्रकरणावर आपल्या शैलीत प्रखर टिका केली आणि त्याचा परिणाम म्हणुन ब्राह्मण मतदारांनी भरभरुन आपले मत मनसेच्या पारड्यात टाकले. या निकालात ब्राह्मण मतदार मनसेकडे झुकल्याचे चांगलेच लक्षात येते. यातुन सर्व पक्षांनी योग्य तो बोध घ्यायला हवा. महाराष्ट्रात पार पडलेल्या महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकींकडे सर्वच राजकीय पक्ष 2014 साली होणार्‍या लोकसभा, विधानसभा निवडणुकीची उपांत्य फेरी म्हणुन बघत होते. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने या निवडणुकींमधे समाजबांधवांना अधिकाधिक उमेदवारी मिळावी, समाजबांधव राजकीय क्षेत्रात सक्रीय व्हावा, यासाठी सर्वच प्रमुख पक्षांशी संपर्क करुन या मागणीचा सातत्यानी पाठपुरावा केला. तसेच अधिकाधिक उमेदवार निवडुन यावेत यासाठीही प्रयत्न करण्यात आले.
मुंबई महापालिकेत तसेच ठाणे महापालिकेत सर्व पक्षांनी मिळुन सरासरी 5 टक्केच  उमेदवार दिले त्यापैकी 50 टक्के निवडुन आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसनी, शिवसेनेचे एकमेव ब्राह्मण खासदार आनंद परांजपे यांना आपल्याकडे वळविल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस आता अधिकाधिक ब्राह्मण कार्यक्रत्यांना उमेदवारी देईल, ही आशा फोल ठरली.
जवळपास सर्वच राजकीय पक्ष जातीय समीकरणांवर, त्या आधारावर उमेदवारी घोषित करुन, ‘‘समाज तोड आणि मत जोड’’, त्या तत्वानुसार व्यवहार करत असुनही स्वःतला ‘सेक्युलर’ म्हणवुन घेतात. या तत्वाला केवळ शिवसेना व मनसे आजही अपवाद दिसतात. पुणे महापालिकेत कॉंग्रेस(आय)ने केवळ दोन ब्राह्मण उमेदवार दिले पण त्यांनाही निवडुन आणण्यात कॉंग्रेसला यश मिळाले नाही. राष्ट्रवादी पार्टीचे जन्मस्थान असलेल्या पुण्यात पार्टीने 4 उमेदवार देऊन ब्राह्मण समाजाला जवळ करत असल्याचे चित्र ऊभे केले पण एकही उमेदवार निवडुन आणु शकले नाही. पुण्यातील एक ब्राह्मण नेते श्री.मोरेश्वर घैसास गुरुजी यांच्या धर्मपत्नी सौ. एश्वर्या घैसास यांना उमेदवारी देऊन ब्राह्मण समाजाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. ब्राह्मणबाहुल्य असलेल्या वेदभवन (बेचाळीस हजार मतदारांपैकी बावीस हजार ब्राह्मण)  प्रभागात सौ.घैसास यांना मतदारांनी नाकारले पण त्याचवेळी त्याच प्रभागातील पुरुष उमेदवार राष्ट्रवादीचेच श्री.बंडु केमसे यांना मात्र त्याच मतदारांनी निवडुन दिले. या प्रभागातील निकाल संपुर्ण राज्यातले मॉडेल ठरेल. भारतीय जनता पार्टीने 9 उमेदवार दिले त्यातील 5 निवडुन आले. मनसेनी 5 उमेदवार दिले त्यातील 2 निवडुन आले तर शिवसेनेने 2 उमेदवार दिले त्यातील 1 निवडुन आला. एकुणच मागील सदनातील 11 सदस्यांवरुन यंदा ब्राह्मण सदस्यांची संख्या 8 वर घसरली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत कॉंग्रेस(आय)ने 3 उमेदवार दिले, ते सर्वच पराभुत झाले. राष्ट्रवादी पार्टीने 2 उमेदवार दिले ते 2 ही निवडुन आले. शिवसेनेने 1 उमेदवार दिला पण तो पराभुत झाला. भारतीय जनता पार्टीने 1 उमेदवार दिला तो निवडुन आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 4 उमेदवार दिले त्यापैकी 1 निवडुन आला. मागील टर्मला 3 ब्राह्मण सदस्य होते, ते आता चार झाले.
इतर शहरातील महापालिकांमधेही साधारण असेच चित्र आहे. सर्वच पक्षांनी जेमतेम 5 ते 6 टक्के ब्राह्मण उमेदवार दिले, त्यापैकी 50 टक्के निवडुन आले. या निवडणुकीत ब्राह्मण मतदारांनी चांगल्या प्रमाणात मतदान केले ही त्यातला त्यात समाधानाची बाब आहे.
समाजबांधवांचा राजकारणात समावेश करणे तसेच त्यांना सक्रीय करणे यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नेहमीच प्रयत्नशील राहील व या क्षेत्रात आपला प्रभावशाली गट निर्माण करण्याचा प्रयत्न करेल.


Thursday, 23 February 2012

कोण म्हणतं गीतेला आतंकवादी साहित्य ?



गीता या विषयावर अनेक मत-मतांतरे सुरु आहेत. गीतेचा अर्थ समजुन न घेता, गीतेवर बाष्कळ भाष्य करण्याचा प्रकार वाढलेला आहे. नुकतेच रशियामध्ये एका कोर्टात गीता आतंकवादाला प्रोत्साहन देणारा ग्रंथ आहे म्हणून त्यावर बंदी घालावी अशी याचीका दाखल करण्यात आली होती. ज्याला गीतेची मूळ भाषा कळत नाही, गीतेबदल संपूर्ण ज्ञान नाही, अशा व्यक्तीने गीतेचा विरोध करावा, हे हास्यास्पद आहे. गीता ही विचार पध्द्ती आहे, गीताकल्याण मंत्र आहे, गीता जीवनाचे आधार आहे.गीता अभ्यासताना तुमचा मनामध्ये जी भावना असते त्याप्रमाणे अर्थ निघतो. जर तुम्ही आतंकवादाचा पुरस्कार करीत गीता अभ्यासले तर ते तुम्हाला आतंकवादी साहित्य वाटेल, जर लोककल्याणाची भावना मनामध्ये घेवून अभ्यासिले तर ते लोककल्याण साहित्य वाटेल, प्रेम भावना मनामध्ये घेवून अभ्यासिले तर प्रेमगीता वाटेल. गीता आरशा आहे त्याच्यासमोर तुम्ही ज्या पध्द्तीने जाल, त्याप्रमाणे प्रतिबिंब दिसेल.
या विषयावर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गोविंद कुलकर्णी विस्तृत विवेचन करणारी लेखमाला एप्रिल २०१२ च्या अंकापासून सुरु करीत आहोत. आपली प्रत आजच राखुन ठेवा.
अमोघ टेंभेकर (सहसंपादक, ब्रह्मकेसरी)

Sunday, 12 February 2012

संपादकीय


  आजच्या जागतिकीकरणाच्या लाटेत ब्राह्मण समाज आपल्या प्राचीन मुल्य व मुळ संस्कृतीपासुन दुरावतो आहे आणि हेच आज ब्राह्मणांसमोर उभ्या ठाकलेल्या समस्यांचे कारण आहे. हे संस्कार आजच्या तरुण पिढीमधे पुन्हा प्रस्थापित करण्याची गरज आहे. ‘संध्यारुपी’’ ज्ञानासोबतच ‘‘संगणकरुपी’’ विज्ञानाची कास धरुन पुढील पिढीला ज्ञानाचे अधिष्ठान देण्यास ‘‘ अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ’’ कटीबध्द आहे. आपल्या ह्याच उद्देशाला अनुसरुन अ.भा.ब्राह्मण महासंघाने ‘ब्रह्मजागृती’’ प्रकाशनाच्या माध्यमातुन ‘‘ब्रह्मकेसरी’’ या मासिकाची सुरुवात केली. आगामी काळात संघटनेचे धोरण, वेळोवेळी योजण्यात येत असलेले कार्यक्रम आदींवर सुसंवाद साधण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होईल.
नुकतेच 24 डिसेंबर 2011 रोजी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे ‘‘पुणे जिल्हा’’ महाअधिवेशन ज्ञाती बांधवांच्या प्रचंड प्रतिसादात व उत्साहात यशस्वीपणे पार पडले. त्यापुर्वी, ‘’प्रदेश युवा आघाडी’’, पुणे शहर ‘युवा आघाडी’’, ‘पुणे जिल्हा’’, ‘’पिंपरी-चिंचवड शहर’’ अश्या प्रमुख चार कार्यकारिणींची स्थापना करण्यात आली तसेच पुणे शहरातील विविध मंडल कार्यकारिणींच्या बांधणीचे कार्यही जोमानी सुरु आहे. कार्यकारिणींचे गठण, पदाधिकार्‍यांची नियुक्ती यासोबत ‘’सभासद नोंदणी’’चे कामही वेगानी सुरु आहे.
या सर्व घडामोडींमुळे इतर समाज व राजकीय पक्षांना आता ब्राह्मणांची दखल घेण्यास भाग पडते आहे. संघटनेनी नुकतेच सर्व राजकीय पक्षांच्या प्रदेश अध्यक्षांना पत्र पाठवुन लोकसंख्येच्या आधारावर ब्राह्मण उमेदवारांची मागणी केली, त्याला सगळ्याच पक्षांनी प्रतिसाद दिला आहे. काही ब्राह्मणविरोधी घटक सतत काही ना काही कुरापत काढुन समाजात अस्थिरता माजवण्याच्या प्रयत्नात आहेत, अशांवर संघटना बारीक लक्ष ठेऊन आहे. याच समाजद्रोही घटकांच्या अपप्रचारामुळे दोन वर्षांपुर्वी लालमहालातुन मध्यरात्री दादोजी कोंडदेवांचा पुतळा कापुन हलवण्यात आला. आता तर ते समर्थ रामदास स्वामींचा मानभंग करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा अपप्रवृत्तींना घटनात्मक मार्गानी वेळीच रोखले पाहिजे. येणार्‍या निवडणुकीत अशांना पाठीशी घालणार्‍या राजकीय नेत्यांना व पक्षांना त्यांची जागा दाखवायला ब्राह्मणांचे 100% मतदान होईल याची काळजी घेण्याची गरज आहे. अश्या प्रवृत्तींना सदनात जाण्यापासुन परावृत्त करायला यावेळी घराबाहेर पडा व आपला मताधिकार वापरा अन्यथा भविष्यकाळात आपली पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही याची पक्की खुणगाठ मनाशी बांधुन घ्या.

‘‘ ब्राह्मणांनो, जागे व्हा, शत-प्रतिशत मतदान करा ’’

Tuesday, 31 January 2012

मत ''दान'' नव्हे, ''अधिकार'' !


दि.15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र मिळाले, पण अखंड हिंदुस्थानाचे  धर्माच्या आधारवर तुकडे झाले आणि देशाची फाळणी होऊन खंडित भारत पदरात आला. एकीकडे स्वातंत्र्याचा जल्लोष सुरु होता तर दुसरी भयंकर रक्तपात सुरु होता. अशा भयंकर परिस्थितीतुन हळुहळु बाहेर निघत असतानाच अचानक 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींचा खुन करण्यात आला. या घटनेची प्रतिक्रीया म्हणुन ब्राह्मणांवर भीषण हल्ले करण्यात आले, ब्राह्मणांचे घरदार लुटल्या गेले, जाळपोळ करण्यात आली, अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर अनेक कुटुंब देशोधडीला लागले. संपुर्ण देशात हीच परिस्थिती होती. या घटनेचा परिणाम म्हणुन ब्राह्मण विरुध्द बाकी देश असे चित्र रंगवण्यात आले.या परिस्थितीत ब्राह्मण पार गोंधळला,घाबरला. तो इतर समाजापासुन दुर गेला. ब्राह्मणांनी स्वःतला एका कोशात बांधुन घेतले. याचाच परिणाम म्हणुन ब्राह्मण समाज आत्मकेंद्रित होत गेला. गांधीहत्येनंतर झालेले हल्ले ही स्वाभाविक प्रतिक्रिया नव्हती. एक भयंकर षडयंत्र होते, ब्राह्मण समाजाला उखडुन फेकायचे, नष्ट करायचे. इंग्रज आपल्या रणनीतीमधे पुन्हा एकदा यशस्वी झाले. आधी देश तर तोडलाच आणि आता एक प्रभावशाली समाज, इतर समाजापासुन दुर सारण्यात यशस्वी झाले.
हा सगळा इतिहास आठवण्याचे कारण, आजच्या समाजकारणात, राजकारणात ब्राह्मणांचा अत्यल्प सहभाग. आजचा ब्राह्मण इतका आत्मकेंद्रित का ? ज्या ब्राह्मणांना लोकमान्य टिळक, आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, स्वा.सावरकर, चाफेकर बंधु अशा असंख्य देशभक्तांची परंपरा असताना ते आज असे निद्रीस्त का आहेत ? भारतरत्न धोंडो केशव कर्वे, गोपाळ गणेश आगरकरांचा वारसा असणारे ब्राह्मण आज आत्मकेंद्रित का आहेत? अठराव्या शतकात इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातुन आपले बस्तान बसवण्यास सुरु केले. ब्रिटीश अधिकारी, कंपनीच्या व्यापाराच्या निमीत्तानी ठिकठिकाणी भेटी देऊ लागले. संपुर्ण देशात फिरुन त्यांचा आराखडा तयार होत होता. या सखोल निरीक्षणातुन त्यांनी एक महत्वाची बाब अचुक हेरली, ती म्हणजे ‘’ब्राह्मणांचा’’ समाजावर असणारा प्रभाव, त्यांना मिळत असलेला मान. ब्रिटीशांनी हे अचुक हेरले की या देशात ब्राह्मणांना राजापेक्षाही अधिक मान आहे. संपुर्ण समाजावर यांची पकड आहे, यांना ‘तोडले’ तर आपले ‘काम’ नक्की फत्ते होणार. बस्स्‍, तिथुन सुरु झाले ब्राह्मणांचे खच्चीकरण. इंग्रजांची ही कपटनीती कमालीची यशस्वी ठरु लागली. वैदिक परंपरा लाभलेल्या हिंदुस्थानातच वेद, पुराण, गीता आदी ग्रंथांना थोतांड म्हटल्या जाऊ लागले तर रामायण, महाभारत हे कपोलकल्पित असल्याचे सांगितल्या जाऊ लागले. वेदांच्या भारतात ब्राह्मणांनाच उपरे ठरवल्या गेले. वेळोवेळी ब्राह्मणांवर वैचारिक हल्ले सुरु झाले. ब्राह्मण, ब्राह्मण्य, वेद, पुराणे, धर्मग्रंथ यांच्या विश्वसनियतेला तडा देण्यात, यांभोवती संशयाचे कडं उभं करण्यात इंग्रज यशस्वी झाले. इंग्रजांचे आगमन ते प्रस्थान या दोन-अडीच शतकांच्या काळात ब्राह्मणांचा प्रभाव प्रचंड प्रमाणात ओसरला. प्रचंड सामाजिक उलथापालथीचा हा काळ होता. याच पार्श्वभुमीवर भारत स्वतंत्र झाला.
स्वातंत्र्योत्तर काळात सामाजिक घडामोडींना अधिकच वेग आला. धर्माच्या आधारावर फाळणी झाली. घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित जाती-जमातींना योग्य शिक्षण घेता यावे, त्यांचे जीवनमान ऊंचवावे, या उद्दात्त हेतुने घटनेमधे या घटकांसाठी आरक्षणाची तरतुद केली. पण सत्ताधिशांनी याचा आपल्या सोयीनुसार वापर सुरु केला. स्वतंत्र भारतात जाती-धर्माच्या भिंती तोडुन एकसंध समाज उभा होण्याएवजी जाती-उपजातींच्या भिंती उभ्या होऊ लागल्या. जातीचे राजकारण सुरु झाले. कोण ? कोणत्या जातीचा ? कोणत्या जातीचे किती मतं ? याला जास्त महत्व आले. जातीच्या मतांचे राजकारण सुरु झाले.
या संपुर्ण घटनाक्रमातुन आपल्या लक्षात येईल, ब्राह्मण समाज आज या उपेक्षित परिस्थित का व कसा आला ? घडणार्‍या घटना घडुन गेल्या आहेत, त्यात आता बदल काय करणार ? पण, येणारा भविष्यकाळ आपण निश्चितच बदलु शकतो. आज उपेक्षिताचं जिणं जगत असलेला ब्राह्मण, आपल्या एकजुटीने यावर मात करुन पुन्हा एकदा प्रभावशाली होऊ शकतो. या लोकशाहीप्रधान देशात आपला प्रभाव निर्माण करायचा असेल तर आपण आपल्या कोशातुन बाहेर येण्याची गरज आहे. समाजकारणात, राजकारणात सक्रीय होण्याची गरज आहे. किंबहुना, आज जे अल्प प्रमाणात का असेना पण राजकारणात सक्रीय आहेत, किमान त्यांना ‘’आपला’’ म्हणुन पाठींबा देण्याची गरज आहे. ब्राह्मण नेत्यांची आजची स्थिती बिकट आहे. आपल्याच लोकांचा पाठींबा नाही, त्यामुळे पक्षात इतर नेते आपल्या जातीच्या मतांच्या ताकदीवर जो मुजोरपणा करतात त्याला पायबंद घालता येत नाही. काम करायला कार्यकर्ता मिळत नाही, आपल्याच लोकांचे मतंही मिळत नाही. त्यांना आपल्या समाजासाठी काम करण्याची इच्छा असली तरी ते करु शकत नाहीत ही वास्तविकता आहे, त्यासाठी गरज हे ती आपण त्यांच्या मागे एकसंधपणे ऊभे राहण्याची.मतदानाच्या दिवशी आपण सुट्टी घालवायला कुटुंबियांनासोबत बाहेर जातो. मतदान केंद्राकडे ढुंकुनही बघत नाही. राजकारण हे अत्यंत गलिच्छ, सगळे चोर आहेत, सगळे एकाच माळेचे मणी, कोणाला मत देणार ? हे आपले  आवडते वाक्य असतात. मग चाळीस पंचेचाळीस टक्के मतदान होऊन कोणीतरी निवडुन येतो, तो कोण ? हे पण आपल्याला महिती नसते. मतदानाविषयी इतके उदासिन असुनही आपण भष्टाचार, सरकारी यंत्रणा यावर मात्र भरपुर तोंडसुख घेत असतो. पण मग हे बदलणार कोण ? ही आपली जबाबदारी नाही का ? आपला मताधिकार न वापरता, आपण जे सत्तारुढ पक्ष, सरकारी यंत्रणा यांच्यावर तोंडसुख घेतो, त्याचा अधिकार आपल्याला आहे का ? भ्रष्टाचारानी बरबटलेल्या राजकारणासारख्या क्षेत्रात आपल्यातील काही लोकं त्यापासुन अलिप्त राहुन चांगले काम करत असतील तर त्यांना पाठींबा देणे आपले कर्त्यव्य नाही का ? आज यावर विचार करण्याची नितांत गरज आहे. गेल्या अडीचशे तीनशे वर्षांपासुन ब्राह्मणांना डावलण्याचा सुरु असलेला प्रकार आता थांबवण्याची आवश्यकता आहे. भारताच्या घटनात्मक तरतुदीनुसार जर आपल्याला आपली शक्ती दाखवायची असेल तर आपला मताधिकार वापरलाच पाहीजे. राजकीय पक्षांनी दखल घ्यावी यासाठी मतदानाच्या माध्यमातुन हे सहजपणे दाखवणे शक्य आहे. आपआपल्या मतदारसंघात जर ब्राह्मण उमेदवार असेल तर प्रथम प्राधान्य त्या उमेदवाराला द्यावे. जर ब्राह्मण उमेद्वार नसेल तर ज्या उमेदवाराला ब्राह्मण समाजाविषयी सहानुभुती असेल त्याला मतदान करावे अथवा ज्या पक्षाचे धोरण ब्राह्मण समाजाच्या हिताच्या दृष्टीने आपल्याला योग्य वाटते त्या उमेदवारांना मत द्यावे. पण, एक खबरदारी निश्चीत घ्यायची आहे, ती म्हणजे आपला ‘मताधिकार’ वापरायचाच. आजही ब्राह्मणांवरील वैचारीक हल्ले थांबलेले नाहीत उलट त्याला राजकीय पाठींब्यामुळे धार चढत चालली आहे. दादोजी कोंडदेवांचे पाय कापुन झाले आता समर्थ रामदास स्वामींना लक्ष्य केल्या जात आहे. समर्थांचे नाव शालेय अभ्यासक्रमातुन तर काढण्यात आलेलेच आहे, आता इतिहासातुनही त्यांना हद्द्पार करावे याचा प्रयत्न सुरु आहे. या प्रकारांना वेळीच रोखले पाहीजे, त्यासाठी गरज आहे ती ब्राह्मण अथवा ब्राह्मणांविषयी सहानुभुती असलेला उमेदवार सदनात जाण्याची. ती खबरदारी आपण निश्चितच घेतली पाहीजे अन्यथा पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही. ब्राह्मण समाजाचे 100% मतदान व्हावे याची काळजी आपण घेतली पाहीजे. आपण स्वःत, आपले कुटुंब व आपला मित्रपरिवार यांनी आपला 
‘’मताधिकार’’ वापरलाच पाहीजे, याची दक्षता घ्यावी.


                                           
                                           आपला
                                

Saturday, 7 January 2012

ब्रह्म केसरी परिचय पत्र

महोदय / महोदया,

''अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ'' गेल्या पाच वर्षांपासुन ब्राह्मण संघटन व समाज जागृतीचे कार्य सातत्यानी करीत आहे, हे आपण जाणताच. ब्राह्मण समाजावर होणारे वैचारिक हल्ले असोत वा  युवक वर्गाला भेडसावणारी नोकरीची समस्या असो ''अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ'' समाजहितासाठी अविरत संघर्ष करीत आहे. नुकतेच न्यु इंग्लिश स्कुल, रमणबाग, पुणे येथे विशाल ''ब्राह्मण महाअधिवेशन'' आयोजित करण्यात आले होते.
समाज जागृती या आपल्या ध्येयाला अनुसरुन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आगामी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ''मतदार जागृती अभियान'' हा उपक्रम राबवत आहे. योग्य व सक्षम उमेदवार निवडुन येणे तसेच जास्तीत जास्त ब्राह्मण उमेदवार यावेळेस नगरसेवकपदी निवडुन यावेत यासाठी अ.भा.ब्रा.महासंघ प्रयत्नरत आहे. अ.भा.ब्रा. महासंघाचे मुखपत्र ''ब्रह्म केसरी'' या माध्यमातुन हे अभियान राबविण्यात येणार आहे.
 ''मतदार जागृती अभियान'' या उपक्रमाव्दारे खालील मुद्द्यांकडे समाजबांधवांवे लक्ष वेधणे अपेक्षित आहे.

* विद्यमान नगरसेवकांनी केलेले विकास कामे मतदारांसमोर मांडणे.

* इच्छुक उमेदवारांचा जाहीरनामा मतदारांसमोर ठेवणे.

* समाजात आलेले राजकीय औदासिन्य घालवणे.

* आत्मकेंद्रीतता सोडुन अधिक समाजाभिमुख  होण्याची गरज मतदारांना पटवुन देणे.

* राजकीय क्षेत्रात समाज बांधवांचा सहभाग वाढवणे.

* ''संघटीत मतदानाचे'' महत्व मतदारांना समजावुन सांगणे.

* ''शत-प्रतिशत'' अर्थात 100 % मतदान होईल यासाठी प्रयास करणे.

या उपक्रमाला आपले सहकार्य मिळेल व त्यातुन जास्तीत जास्त मतदारांमधे जागृती निर्माण करता येईल अशी अपेक्षा आहे.

धन्यवाद !

आपला