Monday, 28 November 2011

ब्राह्मण ऐक्य का हवे ?

                       मी माझा नजिकच्या भुतकाळातला प्रवास बघतो तेव्हा मला आश्चर्य वाटतं की मी ''ब्राह्मण संघटन''  का करतो आहे ? कारण माझी पार्श्वभुमी आहे ती रा.स्व. संघाची. जरी मी स्वःत स्वयंसेवक नसलो तरी वडिलांमुळे तेच संस्कार झाले आहेत. मग ''हिंदु संघटन'' सोडुन हे ''ब्राह्मण संघटन'' का ? हा प्रश्न मलाच पडतो. आताचे माझे काम अगदी नकळत सुरु झाले. अचानक लॅपटॉप घेतला, फेसबुक काय प्रकार आहे बघायला ते सुरु केले, त्यातुन ''ब्राह्मण एकता'' समुहाला जोडला गेलो, अनपेक्षितपणे ह्या समुहाचा ऍडमीन झालो, त्यातुन मग फेसबुकवरचे ग्रुप एकत्र आणायचे आणि काहीतरी ठोस काम सुरु करायचे ह्या प्रयत्नातुन ''अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाशी'' जोडला गेलो, महासंघानी, श्री. गोविंदजी कुळकर्णी यांनी पण विश्वासानी जबाबदारी दिली आणि सध्याचे माझे काम सुरु झाले. माझ्या प्रश्नाचे उत्तर मलाच मिळाले.
                    प.पु.डॉ. हेडगेवार यांनी 1925 साली एक भलंमोठं कोडे सोडवण्याचे काम हाती घेतले. तुकड्या तुकड्यात विभागलेले एखादे चित्र जोडायचे असे एक लहान मुलांचे कोडे असते त्याप्रमाणे प.पु.डॉक्टरांनी हे तुकड्यात विखुरलेले ''हिंदु'' जोडण्याचे काम सुरु केले. आज त्याला काही प्रमाणात यश आले पण प्रमाण अत्यंत अल्प आहे कारण सार्वजनिकपणे जरी समाज एकत्र दिसतो आहे तरी ते वरकरणी दृष्य आहे, मनातुन अजुनही भेदभाव गेलेला नाही, हे कटु आहे पण सत्य आहे.  हा अमक्या जातीचा, तो तमक्या जातीचा, हा आपला तर तो दुसरा, ही भावना कमी अधिक प्रमाणात का असेना पण असतेच. ''हिंदु संघटन'' हे कार्य इतके वर्ष झाले सुरु आहे तरी असे का ? हिंदु संघटनाच्या प्रयत्नांना पहिला तडा गेला तो म्हणजे गांधीहत्येचा. ज्या ब्राह्मण समाजाला सर्व समाजात अग्रस्थान होते, मान होता त्याला लक्ष्य करण्यात आले, झोडपुन काढण्यात आले, मारण्यात आले. संपुर्ण ब्राह्मण समाज सैरभैर झाला, गोंधळुन गेला आणि नकळत त्याने बचावात्मक भुमिका घेणे सुरु केले. इंग्रज परत यशस्वी झाले. जो समाज बुध्दीवान आहे, प्रभावी आहे तो इतर समाजापासुन दुर गेला. त्यातच रा.स्व.संघावर बंदी आणली गेली. गांधीहत्येचे पाप संघावर टाकले गेले. आतातर ब्राह्मण जास्तच गोंधळला. त्याला ''मी ब्राह्मण आहे'' हे सांगायचीही भिती वाटु लागली. हीच भिती पुढे संकोच, लाज ह्या भावनांमधे बदलत गेली.
                        ब्राह्मण बॅकफुटवर गेला आणि त्याला इतर समाजापासुन दुर करण्याचे, मागे पाडण्याचे काम सोपे झाले. मागासवर्गीयांसाठी आरक्षण आले. दहा वर्षांसाठी म्हणुन लागु झाले पण आजतागायत सुरुच आहे उलट त्यात टक्केवारी वाढत जाते आहे. ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्या असणारा वर्ग एकतर मागे पडतो आहे नाहीतर कर्जात बुडतो आहे पण सधन वर्गाचे ह्याकडे लक्ष नाही कारण आपण ब्राह्मण आहोत ह्याची त्यांना लाज वाटते, संकोच वाटतो, भिती वाटते की आपले इतर समाजातील मित्र आपल्याला काय म्हणतील ? आपल्यावर जातीयवादाचा शिक्का बसेल ह्याची. त्यातही जे थोडेफार स्वःतला ब्राह्मण मानतात ते, हा देशस्थ, तो कोकणस्थ अश्या शाखाभेदात, प्रांतभेदात, भाषाभेदात अजुनच जास्त विभागला गेला.
                         हिंदु ऐक्याला दुसरा फटका बसला तो म्हणजे आपल्या राजकीय व्यवस्थेचा. जातीआधारित राजकारणामुळे हिंदु आपल्या जातीच्या वर्तुळातुन बाहेर येवु शकले नाही. कोणत्या भागात कोणत्या जातीची मतं जास्त, त्या जातीचा उमेदवार द्या, त्यांना शैक्षणिक संस्था द्या, सहकारी संस्था द्या असे उद्योग सुरु झाले, प्रत्येक जातीला, प्रत्येक पंथाला आपल्या ''एकगठ्ठा'' मतांची ''किंमत'' कळत गेली. मग सुरु झाले ''वोटबँके''चे राजकारण. जो उमेदवार आपल्या वोटबँकेच्या आधारावर निवडुन गेला त्यानी त्या जोरावर आपल्याच पक्षाला वेठीला धरले, काही सद्गुरुही ह्यात मागे नव्हते, त्यांनी त्यांच्या पंथाच्या जोरावर फायदा करुन घेतला. ह्या सर्व प्रकारात ''हिंदुऐक्य'' बाजुला फेकले गेले आणि ''जातीला'' महत्व आले. ज्याची संख्या जास्त, ज्याची वोटबँक मजबुत, त्याचे महत्व जास्त असे साधे,सरळ समीकरण तयार झाले.
                                 पण असे समीकरणही असुरक्षित वाटत होते, कारण इतके असुनही ब्राह्मण समाजाचा दबदबा काही क्षेत्रात होताच. धार्मिक क्षेत्रात तर होताच पण अर्थ, व्यवस्थापन, विज्ञान, अभियांत्रिकी अश्या सगळ्याच बौध्दीक क्षेत्रात ब्राह्मण आघाडीवर होता पण ''सुदैवानी'' तो सगळीकडे ''एकटाच'' होता. आपली मक्तेदारी टिकवायला ब्राह्मणांना बौध्दीक क्षेत्रातुनही हद्दपार करणेही आवश्यक होते. मग वेगवेगळ्या महासंघ, पँथर, ब्रिगेड यांच्या माध्यमातुन  ब्राहमण समाजावर वैचारीक हल्ला सुरु झाला. ब्राह्मणांच्या चुका, त्यांचा इतिहास, वेद, पुराण यांचा मनाला वाटेल तसा अर्थ सांगुन इतर समाजाची दिशाभुल करणे, ब्राह्मणांविरुध्द गरळ ओकण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु झाले. त्याला साथ मिळाली ती इंटरनेटची, सोशल नेटवर्कींगची. जे जाहीरपणे बोलु शकत नाही ते सहजपणे खोट्या नावानी ब्लॉग लिहुन, पेज तयार करुन ब्राह्मणविरोधी साहित्याचा प्रसार सुरु झाला. अतिशय योजनाबध्द पध्द्तीने ब्राह्मण समाजाला इतर समाजापासुन तोडण्याचे काम सुरु झाले, इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरु झाला. रामदास स्वामी- छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट कधी झालीच नाही, दादोजी कोंडदेव छत्रपतींचे गुरु नाहीत असा प्रचार करुन पुण्यातील लालमहालातील दादोजींचा पुतळा काढला गेला, अमिताभच्या केबीसीतुन, शालेय पाठ्यपुस्तकातुन दादोजींचा उल्लेख वगळण्यात आला. पुढे रामदास स्वामींच्या बाबतीत काय घडेल काहीच सांगता येत नाही. परवा एका नेत्यावर दुसर्‍यानीच हल्ला केला त्यासाठीही ब्राह्मणांनाच जबाबदार धरुन ''त्यांचे शिरकाण करावे'', '' नामोनिशाण मिटवा'' असा प्रचार खोट्या ब्लॉगवरुन सुरु झाला. खुलेआम ब्राह्मणांच्या कत्तलीचे फर्मान निघते तरीसुध्दा ब्राह्मण ''निद्रिस्त'' आहे.
                              अश्या परिस्थितीत, संपुर्ण हिंदुंचे एकत्रीकरण करायचे असल्यास, ते अतिशय कल्पकतेनी, सावधतेनी आणि संयमानी करावे लागेल. हे काम ब्राह्मण समाज अतिशय उत्तमप्रकारे करु शकतो ह्यात शंका नाही. पण हे करायला संपुर्ण हिंदु समाजाचे नेतृत्व ब्राह्मणांना करावे लागेल आणि आजच्या परिस्थितीत नेतृत्वाचा '' संख्या '' हा एकमेव निकष आहे. ''ब्राह्मण संघटनातुन'' आपली संख्या तयार करणे, आपली मजबुत वोटबँक तयार करणे, आर्थिक शक्ती उभारणे हे अत्यावश्यक आहे. जर ''हिंदु संघटनाचे'' कोडे सोडवायचे असेल, इतर समाजाचे वेगवेगळे तुकडे अलगद जोडायचे असतील तर आपला ब्राह्मण समाजाचा विखुरलेला ''तुकडा'' आधी आपल्याला एकसंध बनवावा लागेल. ''ब्राह्मण एकत्रीकरण'' हा  ''हिंदु संघटनाच्या'' ध्येयाकडे जाण्याचा ''राजमार्ग'' आहे. हिच आजची खरी गरज आहे, असे मला वाटते.
                              







Monday, 14 November 2011

अभ्यास वर्ग


               अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ युवा आघाडी हे युवकांचे खुले व्यासपीठ - श्री. गोविंद कुळकर्णी




                        अ.भा.ब्रा.महासंघाची युवा आघाडी ही तरुणांचे प्रश्न, त्यांना भेडसावणार्‍या समस्या, तरुणांना नोकरी, उ्द्योग ह्याकरिता मार्गदर्शन व सहाय्य आदी उद्देशानी स्थापन करण्यात आली असुन युवकांनी ह्या व्यासपीठाचा मनमोकळेपणानी उपयोग करुन घ्यावा, असे आवाहन अ.भा.ब्रा.महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गोविंदजी कुळकर्णी यांनी केले.
                         आज दि.13/11/2011 रोजी अ.भा.ब्रा.महासंघाची महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडी कार्यकारिणी घोषित करण्यात आली, तसेच नवनियुक्त प्रदेश पदाधिकारी व पुणे शहर युवा आघाडी पदाधिकारी यांचा संयुक्त अभ्यासवर्गाचे आयोजन शिक्षक भवन, नवी पेठ, पुणे येथे करण्यात आले होते.
                          प्रास्ताविकात श्री. गोविंदजी कुळकर्णी ह्यांनी संघटनेची माहिती, उद्देश, संघटनामत्क बांधणी तसेच संघटनेची युवा आघाडी ही संकल्पना उपस्थित पदाधिकार्‍यांसमोर विषद केली.
                             प्रमुख वक्ते श्री. संदिपजी खर्डेकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत युवकांचे समाजकारणात तसेच राजकारणातील युवकांचे महत्व लक्षात आणुन दिले. 'प्रत्येक सुरवात ही लहानच असते त्यातुन मनाचा तोल ढळु न देता, स्वप्नरंजनात न रमता वर्तमान लक्षात ठेवुन काम करत राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन श्री.खर्डेकर ह्यांनी केले. आपल्या कार्याप्रति प्रामाणिक, सकारामत्क दृष्टीकोन ठेवावा व समाजात घडणार्‍या घटनांविषयी जागरुक राहावे, असा सल्ला त्यांनी युवा पदाधिकार्‍यांना दिला.
                             दुसर्‍या सत्रात श्री. लक्ष्मीकांत धडफळे यांनी प्रदेश युवा कार्यकरिणी जाहीर केली. श्री. दिलीप सरवटे हयांनी ''सकारामत्क दृष्टीकोन '' ह्यावर अभ्यासवर्गात मार्गदर्शन केले.
                               कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय पं.वसंतरावजी गाडगीळ होते. अ.भा.ब्रा.म. राष्ट्रीय अध्यक्ष श्री.गोविंदजी कुळकर्णी, श्री. विनोद देसाई (संघटन मंत्री), श्री. भालचंद्र डुघ्रेकर (सरचिटणीस,महा.प्रदेश), श्री. लक्ष्मीकांत धड॑फळे (अध्यक्ष, युवा आघाडी, महा.प्रदेश), श्री. अमोघ टेंभेकर (प्रसिध्दी प्रमुख, महा. प्रदेश) तसेच प्रदेश व शहर युवा पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. नंदकिशोर तांबडे यांनी तर आभार प्रदर्शन श्री. अमोघ टेंभेकर ह्यांनी केले.