Thursday, 20 June 2019

मनोगत - अर्पिता टेंभेकर

तुषार सरांनी मला माझे अनुभव लिहायला सांगितले पण मी कधी काही लिहिले नाही पण तरी  थोडंबहुत लिहायचा प्रयत्न करते.

अमोघला सवय आहे हे लग्नाच्या आधीच माहिती होते मात्र खूप कमी सवय होती त्यामुळे कधी आक्षेप घेतला नाही. लग्नानंतर २ वर्षात त्याचे प्रमाण अचानक वाढू लागले.काहीच कारण कळेनासे झाले. कधी वाटायचे आपलीच काही चूक असेल तर कधी वाटायचे मित्र तसे आहेत म्हणून हा वाया जातो आहे. हा आजार आहे वगैरे काही माहितीच नव्हते. त्याची तब्येत बिघडायला लागली, घरातली वागणूक बदलली तशी माझी काळजी पण वाढायला लागली. आपल्या सर्वसामान्य मानसिकतेप्रमाणे आधी मित्रांना दोष दिला, नंतर देवाचे उपाय केले, औषध देऊन बघितले पण काहीच उपयोग झाला नाही. साधारणपणे आपल्याकडे असे काही झाले कि लगेच दोष बायकोलाच दिला जातो तसेच सगळे मला दोष द्यायला लागले. तुझीच चूक असेल, तुझे लक्ष नाही वगैरे. माझे माझ्यापरीने उपाय सुरु होते. कधी समजावून सांग तर कधी चिडून, रागावून सांग तर कधी नवस कर असे सगळे प्रकार सुरु होते. पण उपयोग झाला नाही त्याची तब्येत बिघडत गेली. दोन मुलांची जबाबदारी आणि त्यात याचे असे वागणे मला काहीच सुचत नव्हते. खरे तर पूर्ण सुन्न झाले होते. काहीच मार्ग दिसत नव्हता तशात अचानक मैत्री व्यसनमुक्ती केंद्राचा पत्ता मिळाला. अमोघची तब्येत बिघडली होतीच त्यामुळे तो पण ऍडमिट व्हायला लगेच तयार झाला आणि त्याला मैत्रीमध्ये ऍडमिट केले.

मैत्री मध्ये तुषार सर, रवी सरांची भेट झाली. त्यांनी हा आजार आहे, योग्य उपचार केले आणि काळजी घेतली  तर यातून हा बाहेर निघू शकेल असे सांगितले. तुषार सर आणि रवी सरांनी या आजाराबद्दल, उपचाराबद्दल दिलेली सविस्तर माहिती आणि त्यांची या व्यसनमुक्तीच्या कामाबद्दलची तळमळ बघून आता थोडी आशा वाटायला लागली. आम्ही दर १५ दिवसांनी अमोघला भेटायला नागपूरला जात होतो, फोन वरून चौकशी करत होतो पण तुषार सर, रवी सर कधीही न कंटाळता, न चिडता शांतपणे आम्हाला धीर देत होते, आम्हाला मार्ग सांगत होते. अमोघ ३ महिने ऍडमिट होता, त्या काळात गणपती, नवरात्र असे सण त्याच्याशिवाय करावे लागले. आधी कधी असे झाले नव्हते, मुलांना पण त्याची आठवण यायची. त्यामुळे एकीकडे वाईट वाटत होते तर हे सगळे त्याच्या भल्यासाठी सुरु आहे असे समाधान पण होते. ३ महिन्यानंतर तो परत आला आता सगळे ठीक होईल या अपेक्षेत असतानाच काही दिवसात त्याचे व्यसन पुन्हा सुरु झाले. यावेळी तर दुप्पट प्रमाणात सुरु झाले.
आता मात्र माझा धीर सुटायला लागला. मुलांची काळजी, अमोघच्या राग, भविष्यात काय होईल त्याचे टेन्शन अशा सगळ्या भावना एकदम यायच्या. अमोघची तब्येत जास्तच बिघडत चालली होती. तुषार सर धीर देत होते. त्यांचा सल्ला घेऊन ठरवले कि आता कठोर निर्णय घ्यायचा त्याशिवाय पर्याय नाही. अमोघला परत ऍडमिट करून मी मुलांना घेऊन पुण्याला आली. इथे जॉब सुरु केला. तुषार सरांशी सतत बोलणे सुरु होतेच. या वेळी मात्र अमोघ उपचारांबद्दल गंभीर होता. काही महिन्यात तो पण पुण्यात आला जॉब सुरु केला. चढउतार सुरु होते. सासरे अचानक गेले, सासूचे आजारपणानंतर निधन झाले पण अमोघ तुषार सर, रवी सरांचा सल्ला घेत होता, त्यांच्याशी सतत बोलत होता आणि त्यातून त्याची व्यसनमुक्ती टिकवून ठेवली. यात माझा रोल इतकाच असतो  कि जेव्हा अमोघ टेन्शन मध्ये असतो तेव्हा मी शांत राहून त्याच्याशी सतत बोलत राहते, तो कुठे कमी पडत असेल तर धीर देते आणि जुन्या आठवणी काढून कधी त्याला बोलत नाही. व्यसन हा आजार आहे हे कायम लक्षात ठेवून आपला संयम राखून, त्याच्या मानसिक पातळीवर जाऊन नीट संवाद साधते, त्याच्या चुका त्याला न दुखवता योग्य पद्धतीने सांगते याशिवाय अजूनही अमोघचे वागणे बदलले किंवा इतर काही निर्णय घ्यायचा असेल तर मी आधी तुषार सरांना कॉल करते. ते पण मोठ्या भावाप्रमाणे मार्ग सांगतात. त्यांना अमोघची  मानसिकता अचूक महिती आहे आणि तो कोणत्या वेळी काय विचार करू शकतो याचा त्यांना जास्त अनुभव आहे म्हणून मीसुद्धा सतत त्यांचा सल्ला घेत असते. या पद्धतीने आपण वागलो तर आपल्या व्यक्तीला व्यसनापासून निश्चित दूर राहायला मदत करू शकतो.
धन्यवाद तुषार सर, रवी सर आणि मैत्री परिवार !  

Monday, 17 June 2019

maitri days

मा. तुषार सर,

आपण माझ्यावर लिहीत असलेल्या लेखमालेमुळे भूतकाळातील अनेक आठवणी ताज्या झाल्या त्यातील बहुतांश तर कटू आठवणीच आहेत. तशा खूप आठवणी आहेत मात्र लेखन मर्यादेमुळे त्यातील काही आठवणी शेअर करतो.

 माझी सुरुवात ते पूर्ण व्यसनी यात १० वर्षाचा काळ लागला, जसे आपण म्हणतो कि कोणताही मनुष्य कधीही व्यसनी होऊ शकतो ते अगदी खरे ठरले. सुरुवातीला मला वाटायचे माझा माझ्यावर पूर्ण कंट्रोल आहे मात्र माझे  व्यसन माझ्या न कळत कधी हाताबाहेर गेले ते कळले देखील नाही. सुरुवातीला तर काही आर्थिक अडचण नव्हती, पण जसे जसे व्यसनाचे प्रमाण वाढत गेले तसे आर्थिक चणचण जाणवू लागली. मग कोणाला उधार पैसे माग तर कधी बार मध्ये उधारी ठेव असे प्रकार सुरु झाले. व्यसनामुळे कोणतीही लाज, संकोच वाटत नव्हता कोणाकडून पैसे घ्यायला अनेक समर्थन, अनेक कारण तयार असायचे. असाच एकदा अचानक हॅलॉसनेशन मध्ये गेलो. अमरावतीच्या एका मानसोपचार तज्ज्ञाकडे ऍडमिट केले, तिथे मैत्री व्यसनमूक्ती केंद्राचा पत्ता मिळाला. तोपर्यंत अशी काही उपचार पद्धती असते, असे काही केंद्र असते याची कल्पना देखील नव्हती. मात्र तेव्हा स्वतःहून नागपूरला आलो मैत्री मध्ये ऍडमिट झालो. खरे तर तेव्हा सुद्धा व्यसन गंभीरपणे  घेतले नव्हते, फक्त तब्येत ठीक व्हावी इतकाच उद्देश होता.
सुरुवातीला त्रास झाला मात्र  दोन तीन दिवसात तिथे रुळलो. तेथील समूह उपचारात तसेच इतर बांधवांचे अनुभव ऐकून वाटायचे आपण वेगळे आहोत, या लोकांना नीट जमले नाही म्ह्णून यांचे नुकसान झाले. माझा इगो इतका होता कि मला वाटायचे मला सगळे कळले आहे, मी आता नीट राहीन. बरेच वेळा तर असे पण वाटायचे कि रवी सर, तुषार सर आपल्याला इथे ज्ञान देतात आणि हेच स्वतः रात्री पीत असतील. व्यसनाधीनता हा आजार आहे, याचे गांभीर्य तेव्हा लक्षात आले नव्हते. तब्येत ठीक व्हावी हाच उद्देश असल्यामुळे या आजाराबाबत फार विचार तेव्हा केलाच नाही.आजाराबद्दल नीट समजून घेतले नाही,  तीन महिने उपचार घेऊन ( उपचार कसले खरे तर टाईमपास करून ) परत आल्यानंतर पण फक्त तब्येतीची काळजी होती म्हणून काही दिवस व्यसन बंद होते, मात्र हळूहळू परत सुरु झाले आणि यावेळेस ते मागच्या तुलनेत जास्त प्रमाणात सुरु झाले.
एकदा थांबलेले व्यसन परत सुरु झाले कि दुप्पट प्रमाणात सुरु होते. आता तसेच सुरु झाले होते. आधी मला वाटायचे मी इतर लोकांपेक्षा वेगळा आहे पण आत्ता मी त्याच प्रकारात न कळत आलो. आता कोणतीही दारू असो मला त्याचे भान नव्हते. देशी, हातभट्टी हा भेद कधीच निघून गेला होता. आता झपाट्याने अधोगती सुरु झाली. सामाजिक,आर्थिक, कौटुंबिक, शारीरिक  नुकसान व्हायला लागले मात्र त्याचे भान राहिले नाही.  प्रचंड नुकसान झाल्यानंतर परत एकदा मैत्री मध्ये ऍडमिट झालो. या वेळेस मात्र गंभीर होतो. तुषार सर, रवी सर वरवर जरी कडक वागत असले तरी ते आपुलकीने आणि माझ्यावरील प्रेमामुळे मला न कळत माझ्यावर पूर्ण लक्ष ठेवून मी नीट उपचार घेतो आहे कि नाही याची काळजी घेत होते. तुषार सरांनी यावेळी अजिबात सूट न देता डायरी लिहून घेतली, समूह उपचार, योग घ्यायला लावले,  इतर कामात गुंतवून माझ्यात बदल घडवला. या वेळेस ७ महिने पूर्ण गांभीर्याने उपचार घेऊन आलो. काही दिवस अमरावतीला जॉब करून नंतर पुण्याला आलो.
पुण्याला आलो जॉब लागला मात्र संध्याकाळी कंटाळा यायचा मग तुषार सरांशी बोललो त्यांनी सांगितल्याप्रमाणे एका सामाजिक संस्थेचे काम सुरु केले. त्यात जम बसला. पण व्यसनमुक्तीचे दीडच वर्ष झाले आणि अचानक वडिलांचे निधन झाले. मैत्रीचे सगळे मित्र पाठीशी उभे होते, सगळ्यांना काळजी होती मी परत काही गडबड करतो कि काय ? पण तसे झाले नाही. तुषार सर, रवी सर, आणि अमरावतीचे A A चे मित्र सतत संपर्कात होते त्यामुळे तो धक्का पचवता आला. काही दिवसात आईचे आजारपण आणि त्यातच तिचे निधन झाले तो धक्का पण या सगळ्या मित्रांच्या पाठिंब्यामुळे निभावून नेला.
गेली ११ वर्ष अनेक चढउतार आले, मात्र मैत्रीचे मार्गदर्शक नेहमी पाठीशी उभे होते. रिकामा वेळ सत्कारणी लागावा म्हणून त्यांनी सतत मला जॉब करून इतर सामाजिक कार्य, सकारात्मक काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले, वेळोवेळी सावधगिरी कशी बाळगायची याचा सल्ला दिला. आणि यात सगळ्यात महत्वाची आणि खंबीर साथ माझ्या पत्नीची मिळाली. तिची साथ नसती तर हे ११ वर्ष व्यसनमुक्त राहणे शक्यच नव्हते. मी ज्या ज्या वेळी अडचणीत आलो तेव्हा अर्पिता आणि तुषार सर खंबीरपने माझ्या पाठीशी उभे असतात. या ११ वर्षाचे श्रेय या दोघांचेच आहे.
व्यसनाच्या काळातले अपमान, अवहेलना  तसेच व्यसनमुक्त आयुष्यातले  सन्मानाचे ,समाधानाचे  अनेक अनुभव आहेत, पण ते एका वेळी लिहिणे शक्य नाही म्हणून तूर्तास थांबतो. माझे अजून काही अनुभव पुढे नक्कीच शेअर करेन.
धन्यवाद !