Wednesday, 22 June 2011

ब्राम्हण एकता - माझे मत २

                               "ब्राम्हण एकता" ह्या विषयाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन वेगळा आहे. सगळे सहमत असतीलच असे नाही. मी फक्त माझा दृष्टीकोन मांडतो आहे. मागे मी ह्या विषयावर एक पोस्ट दिली आहे, ती Docs मध्ये बघता येईल.
                                आज  "ब्राम्हण एकता"  हा आपला मंच आहे, आपले उद्दिष्ट ब्राम्हण लोकं एकत्र येणे हा आहे, सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा राजकीय मंच नाही. आपल्याला ह्या मंचावर वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक विचारांची देवाण-घेवाण अपेक्षित आहे. तसे बघता आज आपल्या देशासमोर अनेक प्रश्न उभे आहेत, अश्या परीस्थितीत आपण फक्त "ब्राम्हण एकता"  हे का करतो आहोत? आपण एक नागरिक म्हणून का एकत्र येत नाही? आपण जातीआधारित ग्रुप स्थापन करून फुट पाडतो आहोत का? इतर जाती ,पंथ,धर्म ह्यांना दूर करतो आहोत का? असेही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ह्याचे उत्तर ठामपणे "नाही" हेच आहे. आपण जो ग्रुप स्थापन केला आहे, तो कुणाला विरोध म्हणून नाही, किंवा आपल्या काही मागण्या मान्य करून घेण्यासाठी नाही, आपला सरळ साधा उद्देश ब्राम्हण समाजानी एकत्र येणे एव्हढाच आहे. आपले "सक्षमीकरण" हे आपले उद्दिष्ट आहे. "विरोध" हा आपला पाया नाही. आपली "एकता" हा आपला पाया आहे.
                                  "ब्राम्हण एकता" ह्याकडे थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून बघितले तर खूप चांगले आशादायक चित्र उभे राहते. जसे मी आधीच्या पोस्टमध्ये म्हटले होते कि आज आपण मराठी भाषिक ब्राम्हण एकत्र येवू  आणि नंतर हळू हळू इतरांनाही सामील करत जाऊ आणि सामाजिक समरसतेतून एकात्मिक भारताची पायाभरणी करू. हे कितपत शक्य आहे, ह्याला किती वेळ लागेल हा प्रश्न आहे पण त्या दृष्टीनी आपण सुरुवात तर करू शकतो, तेच आपल्याला करायचे आहे, आपल्यातील एकजूटता विरोधासाठी नाही तर आपली ताकत वाढवण्यासाठी करायची आहे.
                                       असा व्यापक दृष्टीकोन ठेऊन आपल्याला एकत्रीकरण करायचे आहे. आपला सध्याचा उद्देश अगदी साधा आहे, तो म्हणजे मराठी भाषिक ब्राम्हणांचे वैचारिक, सांस्कृतिक एकत्रीकरण. त्यासाठी अगदी साधा निकष आपण ठेवला आहे तो म्हणजे " मराठी भाषिक ब्राम्हण".  ब्राम्हण समाजातील शाखा, उप-शाखा, त्यांची जीवनपद्धती, खाद्य-संस्कृती, त्यांची प्रादेशिक स्थिती, भौगोलिक सीमा आदी बाबी निकष ठेवणे व्यावहारिक ठरणार नाहीत. "मराठी भाषिक ब्राम्हण" हे ध्येय असल्यामुळे एखादी शाखा, त्यांची खाद्द्य-संस्कृती ह्यावर आक्षेप योग्य वाटत नाही. मला ह्याबाबतीत आपल्या मित्रांचे तीव्र मतं पूर्णपणे माहिती आहेत. पण आजची वास्तविक परिस्थिती बघता काही प्रश्न उपस्थित होतात. आपल्याला "ब्राम्हण" म्हणजे नेमके काय अपेक्षित आहे?  रुढीप्रिय, पारंपारिक, कर्मठ ब्राम्हण ? ज्याचा इतर समाजाशी खूप कमी संपर्क असेल, जो आपल्याच कोशात असेल. पूर्वी ज्या कारणामुळे आपला समाज इतर समाजापासून दुरावला होता.आपल्या रूढीप्रियतेनी, कर्मठ वागणुकीने आपल्याच बांधवांना आपण बहिष्कृत  केले, त्यांना दुसरा धर्म स्वीकारावा लागला, आज आपणही तसेच वागायचे का ? सगळ्यात महत्वाचे कि जसे "ब्राम्हणत्व" अपेक्षित आहे ते आजच्या काळात व्यावहारिक आहे का? तेवढा वेळ आज आपल्याकडे आहे का ? आणि समजा तसे वागलोही तर आजच्या जगाच्या प्रवाहापासून आपण बाहेर फेकले जाणार नाही का ? आज आपले अस्तित्व टिकवण्याच्या प्रयत्नात आपणच प्रवाहातून बाहेर फेकले जाणार नाही याची ही काळजी घ्यावी लागेल.
                                    माझ्या ह्या विचारावर अनेक आक्षेप येणार याची मला कल्पना आहे. शाकाहार-मांसाहार, धार्मिक आचरण, वैदिक वारसा, quantity-quality असे मुद्दे येणार आहेत, पण हे सगळे ह्या एकाच पोस्टमध्ये सामावणे शक्य नाही. जसे जसे मुद्दे येतील तसा आपण विचार करत राहू. माझी अपेक्षा एवढीच आहे कि, "ब्राम्हण एकता" हा मुद्दा विचारात घेताना आपली मुलभूत तत्वे न सोडता वर्तमानात आपण प्रगती कशी करू ? ह्यावर विचार व्हावा.  "ब्राम्हणत्व" हा विचार करताना वर्तमानातील "सत्य" स्वीकारावे लागेल. आपल्या समाजातील "आज" आणि  "उद्या" ह्या दृष्टीनी विचार व्हावा, "काल" थोडा बाजूला ठेवावा लागेल. संपूर्ण ब्राम्हण समाजाचे एकत्रीकरण हे ध्येय असल्यामुळे लवचिकता ठेवावी लागेल.
                                     हा माझा विचार आहे, निर्णय नाही. ह्यावर चर्चा अपेक्षित आहे, विरोधही अपेक्षित आहेच. आपले मत मुद्देसूद असल्यास चर्चा करणे अधिक सोयीचे राहील. धन्यवाद !!!                                

Thursday, 16 June 2011

ब्राम्हण एकता - माझे मत

                                ब्राम्हण एकता ह्या विषयावर बऱ्याच लोकांचे मत बघितले. अनेकांचा असा समज आहे कि, ब्राम्हण संघटीत होणे हा "संकुचितपणा" आहे, ब्राम्हण म्हणून संघटीत होणे "प्रतिगामी" आहे, आपण एक माणूस म्हणून संघटीत होण्याची गरज आहे. वरकरणी हे विचार योग्य वाटतात, पण ह्या प्रश्नाकडे  बघण्याचा माझा दृष्टीकोन वेगळा आहे.
                                एक देश, एक विचार हा खूप जुना नारा आहे. पण ते साध्य करणे अजूनही आपल्याला जमलेले नाही, उलट दिवसेंदिवस वेगवेगळ्या धर्मात, जातीत तेढ निर्माण करण्याचे उद्योग काही समाजद्रोही बिनबोभाटपणे करतात आहेत, आणि आपण ते मुकाटपणे बघतो आहोत. आज देश पातळीवरही आपण काहीच करू शकत नाही, भ्रष्ट यंत्रणा, राजकीय अपयश, सरकारी तिजोरीवरचा डल्ला, जाती-धर्मात तेढ हे आपण मुकाटपणे सहन करतो आहोत, कारण आपल्या विचारांमध्ये साम्य असले तरी आपण वेगवेगळे आहोत, एक बुलंद नारा द्यायला एक होणे गरजेचे आहे. पण आता प्रश्न येतो कि, एवढे सगळे वेगवेगळे प्रश्न असताना आपण "ब्राम्हण" म्हणून का एकत्र यायचे ? एक नागरिक म्हणून का नाही ? ह्याचे उत्तर अगदी साधे आहे, आज आपल्याच नावेला भोकं पडली आहेत, आणि आपण देशाचं जहाज किनाऱ्यावर नेण्याच्या गप्पा करतो. आजची गरज आहे ती आपल्या नावेची भोकं बंद करून आधी आपली नाव भक्कम करण्याची. उगाच मोठमोठ्या गप्पा मारून काहीच साध्य होणार नाही.
                                                आपल्या प्रवासाची दिशा अगदी साधी आहे. आज आपण मराठी भाषिक ब्राम्हण एकत्र येतो आहे. आपल्या विचार मंथनातून आपली एक वैचारिक बैठक तयार होईल, आपल्यातले मतभेद एकत्र विचार करून आपल्याला सोडवता येतील, एकदा आपला पाया तयार झाला कि इतर भाषिक ब्राम्हण आपल्यात सामील करून घेता येतील आणि अशीच हि चळवळ पुढे इतर जातीत, इतर राज्यात नेता येईल. असा हिंदू, जो जाती-पाती, पंथ हे बाजूला सारून एक झाला कि मग हळूहळू  इतर धर्मही आपल्याला सामील करता येईल त्यातून एकात्मिक भारत साकार होईल. हा कदाचित माझा कल्पनाविलास किंवा स्वप्नरंजन  वाटेल, पण मला आशा आहे कि, आजचा जगाचा वेग बघता हे लवकर साध्य होऊ शकते.आणि ह्याला वेळ लागेल हे मान्य केले तरी, कधीतरी तर सुरवात करावीच लागेल. मग आताच का नाही ?
                                                "ब्राम्हण एकता " हि आज संकुचित वाटत असली तरी भविष्याचा विचार करता एक सुरवात म्हणून योग्य वाटते. पूर्वी मनुने चार वर्ण सांगितले होते, त्यात ब्राम्हण हे उच्च स्थानावर होते, पण आज आपण जी भविष्याची पायाभरणी करतो आहोत त्यात आपण आपल्याकडे सगळ्यात खालचे स्थान घेतो आहोत. राष्ट्रीय एकतेची जी  "दहीहंडी"  आपल्याला हस्तगत करायची आहे त्यात सगळ्यात वर कोण राहील ? हे महत्वाचे नाही, तर आपण,जो सगळ्यात खालचा थर आहे, तो भक्कम झाला पाहिजे.
सगळ्यात खालचा भक्कम थर हा मराठी ब्राम्हणांचा, त्या नंतर इतर ब्राम्हण, त्यावर संपूर्ण मराठी लोकं, असे  एक एक थर लावत गेलो तर राष्ट्रीय एकतेची आज खूप उंच वाटणारी दहीहंडी नक्कीच फुटेल असा विश्वास वाटतो. 
                                               मला वाटतं कि आता मांसाहार,शाकाहार हे प्रश्न उपस्थित होणार नाही. अर्थात, हे माझे वैयक्तिक मत आहे. ब्राम्हण एकता ह्या ग्रुपचा ह्या मताशी सहमती असेलच असे नाही. "ब्राम्हण एकता" हा ग्रुप एक सामाजिक, सांकृतिक चळवळ आहे, त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. कृपया माझ्या वैयक्तिक मताशी ब्राम्हण एकता ग्रुपला जोडू नये हि विनंती. धन्यवाद !!!

ब्राम्हण एकता हवी का ?

                              मला असा प्रश्न विचारण्यात आला कि ब्राम्हण हे बुद्धीबलानी, गुणांनी आधीच समोर आहेत, मग  त्यांना संघटीत होण्यची गरज काय? व्यक्तिश: मला आतापर्यंत तरी मी ब्राम्हण आहे म्हणून कोणताही वाईट अनुभव आलेला नाही. पण समाजाचा एक घटक म्हणून विचार करताना आपण संघटीत होण्याची गरज वाटते. फक्त दोन-तीन  क्षेत्रांचे उदाहरणे देतो नाही तर हा विषय तसा खूप मोठा आहे.
                                बँकिंग ह्या क्षेत्रात ब्राम्हण हा अविभाज्य घटक आहे. अनेक बँकेच्या क्लार्क ते संचालक मंडळापर्यंत ब्राम्हणांची मक्क्तेदारी राहिलेली आहे. विक्रम पंडितनी सिटी बँक परत एकदा शिखरावर नेली, पण आपली अशी म्हणून एकही बँक नाही, सारस्वत बँक, कुणबी बँक अश्या अनेक बँक असताना एकही "ब्राम्हण बँक" नाही. आपण आपल्यातला कुणाला पुढे करत नाही, ज्यानी-त्यानी स्व:तचे बघावे, असा आपला विचार असतो. आज बँकिंग क्षेत्रातही आपण अल्पसंख्य होत चाललो आहे.
                                   शिक्षण क्षेत्र हे आधी ब्राम्हणांचे मानले जायचे. प्रशाशकिय  सेवांमध्ये ब्राम्हण बरेच पुढे होते. आज शिक्षण क्षेत्रात आपले स्थान शोधावे लागते. प्रशाशकिय सेवांमध्ये जवळपास हद्दपार झालो आहोत. सरकारी असो नाही तर खाजगी ब्राम्हण म्हणून आपला पूर्वीचा दबदबा राहिलेला नाही. माहिती-तंत्रद्यान क्षेत्राचीही तीच गत आहे, आपण त्यात मागे नाही पण आपला दबदबाही नाही.
                                     सहकार क्षेत्र  हे पूर्वीपासूनच मराठा समाजाचे आहे आणि ते अजूनही टिकून आहे. त्या मागे त्यांची एकता आहे. वैचारिक, राजकीय मतभेद असले तरी सहकाराचा विषय येतो तेंव्हा ते एक असतात.
                                       सगळ्यात महत्वाचे क्षेत्र, राजकारण. राजकारणात आज आपले स्थान काय ? बरेच जण म्हणतील तो आपला प्रांत नाही. पण आतापर्यंतचा अनुभव असा आहे कि तुमची राजकीय ताकत नसेल तर तुमची किंमत शून्य आहे. आज फक्त ओबीसी हा एकच निकष लावून कोणीही संपूर्ण पक्ष वेठीला धरू शकतो. ओबीसी, दलित, मुस्लीम नेत्यांना राजकारणात किंमत आहे ती त्यांच्यातल्या एकतेमुळे. आज जातीआधारित आरक्षण नको, आर्थिक निकष लावावे, असे आपल्यातल्या अनेकांना वाटत असेल पण एकत्रित आवाज उठवत नाही तोपर्यंत कोणीही आपल्याकडे लक्ष देणार नाही, कारण मतांच्या राजकारणात, संख्या लागते, बुद्धीबळ नाही, किंवा गुणही नाही. मतं किती ? त्यावर तुमचा विचार होतो. आज राजकारणात आपण कुठे आहोत ? मनोहर जोशी, नितीन गडकरी असे काही नावं सोडली तर कोणीच नाही. कम्युनिस्ट पार्टीत मृणाल गोरे नंतर कोणतंच नाव दिसत नाही. विठ्ठलराव गाडगीळ यांच्यानंतर काँग्रेसमधेही शुकशुकाट आहे.
                                  आज आपण सर्व क्षेत्रात एक व्यक्ती म्हणून समोर आहोत, पण एक समाज म्हणून खूप मागे आहोत. आपण सगळे स्व:तच्या कोशात आहोत, आपल्या बाहेर काय सुरु आहे ? त्याकडे आपले लक्ष नाही. अनेक गोष्टींकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन सारखा आहे, अनेक बाबींवर आपल्या मनातला आवाज सारखा आहे, अनेक घटनांवर आपले मत एक आहे, पण हे फक्त स्व:त पुरतं  मर्यादित आहे. आपण एक झालो तर आपल्या आतला हुंकार, एक बुलंद नारा होईल. आज गरज आहे ती बुलंद आवाजाची, मनातच कोंडणारा विचार नको. आपल्यातला निखारा, ज्वाला होऊन प्रज्वलित व्हायला आपण संघटीत होणे ही आजची गरज आहे.
                                      आपल्याला संघटीत व्हायचे आहे ते कुणाला विरोध म्हणून नाही तर कुणाचा विरोध आपल्याला होऊ नये म्हणून. आपली एकजूटता आपल्याला दाखवायची आहे ती कोणता फायदा घ्यायला नाही तर कोणी आपला गैरफायदा घेऊ नये म्हणून. आपण एक व्यक्ती म्हणून नक्कीच यशस्वी आहोत, पण आता एक समाज म्हणून यशस्वी व्हायचे आहे. ते साध्य करायला आपल्याला संघटीत होणे गरजेचे आहे.                             एकदा समाज म्हणून संघटीत झालो कि एक देश म्हणून संघटीत होणे अधिक सोपे होईल.

Monday, 13 June 2011

युवक आणि राजकारण

                          भारताची आजची आंतरराष्ट्रीय प्रतिमा काय आहे ? भ्रष्ट राजकारणी, मुजोर नोकरशाही, संपूर्ण यंत्रणेतील बेबंदशाही , ढिसाळपणा, अतिरेक्यांचा धुडगूस , नक्षल्यांचा वाढता धोका, सीमेवर अशांतता, वाढती महागाई ,शिक्षणाचा बाजार आणि हे निमुटपणे सहन करणारी जनता.
                           दरवेळी असे प्रश्न चर्चेला येतात तेव्हा एक मुद्दा ठळकपणे जाणवतो कि, आजचा तरुण ह्या पासून अलिप्त का आहे ?, त्याला ह्या गोष्टींशी काहीच देणं-घेणं नाही का ? आजचा युवक फक्त स्व:तचा विचार करतो. माझे शिक्षण, माझे करीयर, माझे कुटुंब (तेही बायको आणि मुलं), स्व:तची आर्थिक आणि भौतिक प्रगती ह्यापलीकडे तो विचार करत नाही.प्रत्येकजण आपल्यातच मश्गुल आहे. प्रत्येक मुद्द्यावर तरुणाईचे उत्तर ठरलेले आहे, हे असेच चालणार, आपण काही करू शकत नाही, ह्या देशाला देवच वाचवू  शकतो वगैरे. पण खरंच असे आहे का ? माझे मत वेगळे आहे. आजचा युवक खूप हुशार आहे. सामाजिक जाणीव त्यालाही आहे. पण त्याला गरज आहे एका विचाराची, एका नेत्याची, मार्गदर्शनाची. अण्णा हजारेंना जो तरुणांचा पाठींबा मिळाला तो हेच दर्शवतो.
                              आज अभाविप, एनएसयुआई, विद्यार्थीसेना ह्या सगळ्या थंड बस्त्यात गेल्या आहेत.कॉलेज, विद्यापीठ निवडणुका बंद झाल्या तश्या विद्यार्थी चळवळी हि बंद झाल्या. राजकीय नेत्यांनी विद्यार्थी संगठना आपल्या स्व:तच्या शक्ती-प्रदर्शनासाठी वापरणे सुरु केले. इतक्यातला भूतकाळ बघितला तर एकही विद्यार्थी चळवळ आठवत नाही. आज सगळ्या संगठना पक्षीय भांडणासाठीच वापरल्या जातात आहेत. राजकीय पक्षांनी विद्यार्थी संगठना आपल्या दबावगटात बदलून टाकल्या. आज सगळ्या प्रमुख पक्षांचे वरिष्ठ नेते हे विद्यार्थी चळवळीतून आलेले आहेत पण एकाही नेत्याचे ह्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. एकाही नेत्यानी युवा नेत्तृत्व तयार करण्याचे कष्ट घेतले नाहीत. त्यात भर म्हणजे आजची भ्रष्ट राजकीय परिस्थिती, ह्यात गुण असूनही सामान्य युवक नेता होऊ शकत नाही. तारुण्याचा उमेदीचा काळ सतरंज्या उचलण्यात, दुकाने बंद करण्यात, बसेस जाळण्यात वाया घालवण्यापेक्षा  तो आपला मार्ग शोधतो आणि सुरक्षित आयुष्य जगतो त्यात त्याचे काय चुकले? नेत्याचा मुलगा किंवा मुलगी पुढचे नेते असतील तर तरुणांनी कोणत्या महत्वकान्क्षेनी राजकारणात यावे? घराणेशाहीचा आरोप झाल्यावर एक उत्तर ठरलेले असते, कि डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअरचा इंजिनिअर मग नेत्याचा मुलगा नेता का होऊ शकत नाही? मुद्दा बरोबर आहे, पण डॉक्टर, इंजिनिअरचे मुले तेच होतात ते त्याच्या गुणांमुळे, बापाच्या कृपेनी नाही. नेत्याच्या मुलात किवा मुलीत तसे गुण आहेत का? हे पक्ष बघतात का? कि मुलांना संधी देताना त्यांची लायकी बघण्यापेक्षा त्यांच्या बापाचे उपद्रवमूल्य बघितल्या जाते? गटा-तटाचे राजकारण, जातीय समीकरण, आर्थिक गणित, ह्यामुळे सामान्य युवक नेता होऊ शकत नाही.
                              ह्यातून मला एक मार्ग दिसतो, तो म्हणजे कॉलेज, विद्यापीठ निवडणुका पुन्हा सुरु करणे. ह्यावर आक्षेप येईल कि आधी पैसा, अपहरण, खून, मारामारी ह्यासारख्या गैरप्रकारांमुळे ह्या निवडणुका बंद केल्या मग आता परत हे सुरु करायचे का? मला वाटत कि करायला हवे. आताच्या पिढीला हा अनुभव घेवू द्यावा. ह्यामुळे त्यांच्यातली सामाजिक,राजकीय विचारशक्ती वाढेल. निवडणुका, विद्यार्थी चळवळ ह्यातून त्यांचे विचार तयार होतील. स्व:ततील नेत्तृव गुण ओळखता येतील. युवा नेत्तृवाची उणीव काही प्रमाणात भरून निघेल. आणखी एक महत्वाचे कि आज राजकीय नेत्यांना त्यांच्या मुलांना समोर करायला जे कारण आहे कि दुसरे कोणी नाही म्हणून आमचे मुलं, ह्यालाही लगाम बसेल. गैरप्रकार होतील म्हणून निवडणुकीवर सरसकट बंदी योग्य वाटत नाही. युवकांनी करीयर म्हणून राजकारणाचा विचार करावा असे आपण म्हणतो, पण त्यांनी ह्याचा कधी अनुभव घेतला नाही तर ते इकडे कसे येतील? आजचा तरुण हुशार आहे, तो ह्या गैरप्रकारांना भिक न घालता पुढे जाऊ शकतो, फक्त त्यांना मार्ग दाखवायची गरज आहे. कॉलेज, विद्यापीठ निवडणुका पुन्हा सुरु कराव्यात, युवाशक्तीचे चैतन्य पहा पुन्हा बहरेल.

Thursday, 2 June 2011

हिंदू आणि मी

                          माझा  फेसबुकवरचा   profile बघून  अनेकांनी  विचारले कि मी त्यात  "Hindu" का लिहिले नाही ?  "Humanism" का लिहिले ?
                           मला  वाटत कि  माझा  धार्मिक  दृष्टीकोन  मानवता  आहे ." " हिंदू "   हा   शब्द , त्याचा  अर्थ खूप व्यापक आहे. हिंदू  हि एक संस्कृती आहे, सभ्यता आहे. हिंदू  हा  धर्म  नाहीतर  एक जीवनपद्धती आहे. "हिंदू" ह्या एका शब्दातच " सर्वसमावेशकता " आहे. सर्वांना त्यांच्या भल्या-बुऱ्या गुणांसह सामाऊन घेणे हे "हिंदू" मध्ये अभिप्रेत आहे. आणि मला वाटत कि, माझा दृष्टीकोन एव्हढा व्यापक नाहीये. "मानवता" हि "हिंदुत्वात " सामावली आहे.
                             "हिंदुत्वातला" एक अल्प अंश  "   मानवता" तीही  (थोडीफार) माझ्यात आहे, सर्वसमावेशकता  माझ्यात  नाही, म्हणून  मी तसे  नमूद  केले.
                                 मी "हिंदुत्वाचा" अभ्यासक नाही , मला जेव्हढे कळले ते नमूद केले. जाणकारांनी मार्गदर्शन करावे.