Monday, 13 June 2011

युवक आणि राजकारण

                          भारताची आजची आंतरराष्ट्रीय प्रतिमा काय आहे ? भ्रष्ट राजकारणी, मुजोर नोकरशाही, संपूर्ण यंत्रणेतील बेबंदशाही , ढिसाळपणा, अतिरेक्यांचा धुडगूस , नक्षल्यांचा वाढता धोका, सीमेवर अशांतता, वाढती महागाई ,शिक्षणाचा बाजार आणि हे निमुटपणे सहन करणारी जनता.
                           दरवेळी असे प्रश्न चर्चेला येतात तेव्हा एक मुद्दा ठळकपणे जाणवतो कि, आजचा तरुण ह्या पासून अलिप्त का आहे ?, त्याला ह्या गोष्टींशी काहीच देणं-घेणं नाही का ? आजचा युवक फक्त स्व:तचा विचार करतो. माझे शिक्षण, माझे करीयर, माझे कुटुंब (तेही बायको आणि मुलं), स्व:तची आर्थिक आणि भौतिक प्रगती ह्यापलीकडे तो विचार करत नाही.प्रत्येकजण आपल्यातच मश्गुल आहे. प्रत्येक मुद्द्यावर तरुणाईचे उत्तर ठरलेले आहे, हे असेच चालणार, आपण काही करू शकत नाही, ह्या देशाला देवच वाचवू  शकतो वगैरे. पण खरंच असे आहे का ? माझे मत वेगळे आहे. आजचा युवक खूप हुशार आहे. सामाजिक जाणीव त्यालाही आहे. पण त्याला गरज आहे एका विचाराची, एका नेत्याची, मार्गदर्शनाची. अण्णा हजारेंना जो तरुणांचा पाठींबा मिळाला तो हेच दर्शवतो.
                              आज अभाविप, एनएसयुआई, विद्यार्थीसेना ह्या सगळ्या थंड बस्त्यात गेल्या आहेत.कॉलेज, विद्यापीठ निवडणुका बंद झाल्या तश्या विद्यार्थी चळवळी हि बंद झाल्या. राजकीय नेत्यांनी विद्यार्थी संगठना आपल्या स्व:तच्या शक्ती-प्रदर्शनासाठी वापरणे सुरु केले. इतक्यातला भूतकाळ बघितला तर एकही विद्यार्थी चळवळ आठवत नाही. आज सगळ्या संगठना पक्षीय भांडणासाठीच वापरल्या जातात आहेत. राजकीय पक्षांनी विद्यार्थी संगठना आपल्या दबावगटात बदलून टाकल्या. आज सगळ्या प्रमुख पक्षांचे वरिष्ठ नेते हे विद्यार्थी चळवळीतून आलेले आहेत पण एकाही नेत्याचे ह्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. एकाही नेत्यानी युवा नेत्तृत्व तयार करण्याचे कष्ट घेतले नाहीत. त्यात भर म्हणजे आजची भ्रष्ट राजकीय परिस्थिती, ह्यात गुण असूनही सामान्य युवक नेता होऊ शकत नाही. तारुण्याचा उमेदीचा काळ सतरंज्या उचलण्यात, दुकाने बंद करण्यात, बसेस जाळण्यात वाया घालवण्यापेक्षा  तो आपला मार्ग शोधतो आणि सुरक्षित आयुष्य जगतो त्यात त्याचे काय चुकले? नेत्याचा मुलगा किंवा मुलगी पुढचे नेते असतील तर तरुणांनी कोणत्या महत्वकान्क्षेनी राजकारणात यावे? घराणेशाहीचा आरोप झाल्यावर एक उत्तर ठरलेले असते, कि डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअरचा इंजिनिअर मग नेत्याचा मुलगा नेता का होऊ शकत नाही? मुद्दा बरोबर आहे, पण डॉक्टर, इंजिनिअरचे मुले तेच होतात ते त्याच्या गुणांमुळे, बापाच्या कृपेनी नाही. नेत्याच्या मुलात किवा मुलीत तसे गुण आहेत का? हे पक्ष बघतात का? कि मुलांना संधी देताना त्यांची लायकी बघण्यापेक्षा त्यांच्या बापाचे उपद्रवमूल्य बघितल्या जाते? गटा-तटाचे राजकारण, जातीय समीकरण, आर्थिक गणित, ह्यामुळे सामान्य युवक नेता होऊ शकत नाही.
                              ह्यातून मला एक मार्ग दिसतो, तो म्हणजे कॉलेज, विद्यापीठ निवडणुका पुन्हा सुरु करणे. ह्यावर आक्षेप येईल कि आधी पैसा, अपहरण, खून, मारामारी ह्यासारख्या गैरप्रकारांमुळे ह्या निवडणुका बंद केल्या मग आता परत हे सुरु करायचे का? मला वाटत कि करायला हवे. आताच्या पिढीला हा अनुभव घेवू द्यावा. ह्यामुळे त्यांच्यातली सामाजिक,राजकीय विचारशक्ती वाढेल. निवडणुका, विद्यार्थी चळवळ ह्यातून त्यांचे विचार तयार होतील. स्व:ततील नेत्तृव गुण ओळखता येतील. युवा नेत्तृवाची उणीव काही प्रमाणात भरून निघेल. आणखी एक महत्वाचे कि आज राजकीय नेत्यांना त्यांच्या मुलांना समोर करायला जे कारण आहे कि दुसरे कोणी नाही म्हणून आमचे मुलं, ह्यालाही लगाम बसेल. गैरप्रकार होतील म्हणून निवडणुकीवर सरसकट बंदी योग्य वाटत नाही. युवकांनी करीयर म्हणून राजकारणाचा विचार करावा असे आपण म्हणतो, पण त्यांनी ह्याचा कधी अनुभव घेतला नाही तर ते इकडे कसे येतील? आजचा तरुण हुशार आहे, तो ह्या गैरप्रकारांना भिक न घालता पुढे जाऊ शकतो, फक्त त्यांना मार्ग दाखवायची गरज आहे. कॉलेज, विद्यापीठ निवडणुका पुन्हा सुरु कराव्यात, युवाशक्तीचे चैतन्य पहा पुन्हा बहरेल.

No comments:

Post a Comment