पार्श्वभूमी - ब्राह्मणांमधे जो हा एकप्रकारचा आत्मकेंद्रितपणा वा स्वतःच्या
जातीबद्दलचा न्युनगंड निर्माण झाला आहे, त्याला बरीच मोठी पार्श्वभूमी आहे. ईस्ट
इंडिया कंपनीच्या माध्यमातून बिटिशांनी हिंदुस्थानात प्रवेश केला. हिंदुस्थानचा
राजकीय, सामाजिक तसेच भौगोलिक अभ्यास करताना धूर्त ब्रिटिशांनी एक बाब नेमकी
हेरली. या प्रदेशात हिंदु धर्म घट्टपणे रोवला गेला आहे व या धर्मात सर्वोच्च
सन्मानाचे स्थान हे ब्राह्मणांचे आहे. राजापेक्षा जास्त मान हा राजपुरोहितांना
आहे. कावेबाज ब्रिटिशांनी आपली ‘‘फोडा आणि झोडा’’ ही कुटनिती वापरायला सुरूवात
केली. सर्वप्रथम त्यांनी वेद-पुराणे यांच्या सत्यतेविषयी जनमानस कलुषित केले.
वेद-पुराणांना वैज्ञानिक आधार नाही, हे थोतांड आहे, याला ऐतिहासिक पुरावे नाहीत,
हे जनतेच्या मनात बिंबवून त्याविषयी संभ्रमाचे वातावरण तयार केले. स्पृश्य-अस्पृश्य
भेद ब्राह्मणांनी सुरु केला हा एक मोठा मुद्दा उपस्थित केला गेला. वास्तविक, वैदिक
धर्मात जातीसंस्थेचा कुठे उल्लेखच नाही. कोणत्याही हिंदु धर्मग्रंर्थात
जातीसंस्थेच्या निर्मितीबाबत विधान नाही. अठराव्या-एकोणिसाव्या शतकात हे भेद
प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनात अंगिकारले गेले होते हे सत्य आहे, पण याची निर्मिती
कधी, कुणी केली याबद्दल कुठेही उल्लेख आढळत नसताना याची निर्मिती ब्राह्मणांनी
केली, हे सांगुन इंग्रज मोकळे झाले. आपण इतिहासावर नजर टाकली तर दिसते दहाव्या
शतकात हिंदुस्थानात बौध्द धर्म बराच प्रभावी होता. जवळपास दिड ह्जार वर्षांचा
इतिहास बौध्द धर्माच्या प्रभावाची साक्ष देतो. बौध्द धर्म हा जातीविरहित असताना हे
जातींचे खुळ आले कुठुन, कसे ? हे एक न उलगडलेले कोडे आहे. वर्ण आणि जाती हे
सर्वस्वी वेगवेगळे आहेत. आजचे तथाकथित बुध्दीवादी म्हणतात की, गौतम बुध्दांनी
जातीव्यवस्थेला विरोध केलेला आहे. बुध्द्दांनी जातीला नव्हे तर वर्ण व्यवस्थेला
विरोध केला आहे. हा जो जातीय भेदाभेद आढळतो तो मध्यकाळात आढळतो. जर ही
जातीव्यवस्था ब्राह्मणांनी स्थापन केली असे मानले तर मग ब्राह्मणांनी स्वतःमधेच
ढीगभर पोटजाती का निर्माण केल्या ? मुस्लिम आक्रमकांचा कालखंड ते ब्रिटिशांचे आगमन
या मधल्या काळातील इतिहास उपलब्ध नाही, या आक्रमकांच्या, तत्कालिन जनतेच्या
दृष्टीने लुटारूंच्या काळातील स्थित्यंतरे लिखित स्वरूपात उपलब्ध नाहीत, परंतू,
व्यवसायाधारित जाती या जन्माधारित मानल्या जाण्याचा हाच कालखंड आहे. जातीसंस्था वा
जातीविरोधाचा जो उल्लेख सापडतो सोळाव्या-सतराव्या शतकात, मधल्या कालखंडाबद्दल
अद्यापही अनभिज्ञता आहे. इंग्रजांचा शिरकाव होण्याअगोदरचा जातींकडे बघण्याचा
समाजाचा दृष्टीकोन बराच सकारात्मक असावा असे दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
‘शुद्र पुर्वी कोण होते ?’ या ग्रंथात त्यांनी स्पष्टपणे नमुद केले आहे की
जातीव्यवस्था ही ब्राह्मणांनी अथवा मनुने निर्माण केलेली नाही. इंग्रज
येण्याअगोदरचा इतिहास लिखित स्वरूपात उपलब्ध असता तर यावर प्रकाश पडला असता. ब्रिटिशांनी
अजुन एक आरोप लावला तो म्हणजे ब्राह्मणांनी शुद्रांवर ज्ञानबंदी लादली. वास्तविक
ब्रिटिश अधिकारी सर थॉमस मन्रो, मद्रास प्रांत, डब्लु. एडम्स, बंगाल प्रांत यांनी
सादर केलेल्या अहवालात (1822-25) स्पष्टपणे नमुद केले आहे, हिंदुस्थानमधे साक्षरता
90.09 इतकी प्रचंड आहे व यात समाजातील सर्वच घटकांचा समावेश आहे, तसेच जवळपास 95
टक्के खेडेगावात शाळा असुन शुद्रांमधे साक्षरतेचे प्रमाण 45 टक्के असल्याचेही
आर्वजुन नमुद केलेले आहे. संतसाहित्यात संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत
तुकाराम यांचे अभंग उपलब्ध आहेत. जर अशी काही ज्ञानबंदी असती तर या अभंगांची
निर्मिती कशी झाली ? या उलट समाजातील काही प्रथा न पाळल्याच्या आरोपावरून संत
ज्ञानेश्वर यांना ब्राह्मण असूनही आपल्या भावंडांसह अनेक हालअपेष्टांचा सामना
करावा लागला. ब्रिटिशांच्या आगमनाच्या काळात 90.09% असलेले साक्षरतेचे प्रमाण 19%
इतके प्रचंड खालवले होते, मग निरक्षरतेला जबाबदार कोण ? ब्रिटिश की ब्राह्मण ? लॉर्ड मॅकोलेने या सर्व
बाबी आपल्या शैक्षणिक धोरणातून अशा आक्रमकपणे हिंदुस्थानातील समाजमनावर बिंबवल्या
की, सुशिक्षित
ब्राह्मण ही तेच सत्य मानु लागला. वारंवार तेच तेच बिंबवल्यामुळे ब्राह्मणेतर समाज
ब्राह्मणांना आपला शत्रु मानु लागला.
दरम्यानच्या काळात, ब्रिटिश राजवट
स्थिरावली. इथले प्रशासन चालवण्यास त्यांनी इंग्रजी शिक्षणाचा प्रसार सुरू केला. यात प्रामुख्यानी ब्राह्मणांनी आघाडी घेतली.
अनेकांनी इंग्लंडला जाऊन उच्चशिक्षणही घेतले. या शिक्षणाचा परिणाम म्हणजे या
उच्चशिक्षितांमधे स्वतःच्या धर्मातील कुप्रथा, अनिष्ट चालीरिती याबाबत जागृती
निर्माण झाली. समाजसुधारणेचे नवे वारे वाहु लागले. समाजसुधारणेच्या या चळवळीचे जनक
ब्राह्मण होते तसेच ही चळवळ जोरकसपणे लावुन धरणारे ही ब्राह्मण होते. ज्या ज्या
ब्राह्मणेतर समाजसुधारकांनी हे कार्य सुरू केले त्यालाही या सुधारक ब्राह्मणांचा
सक्रीय पाठिंबाच होता. या सुधारकी विचारांना सनातनी ब्राह्मणांनी प्रखर विरोध
केला. हा विरोध, ब्राह्मण सुधारकांना तसेच ब्राह्मणेतर सुधारकांना, दोघांनाही
झाला. सुधारकी विरूध्द सनातनी म्हणून हा वाद प्रसिध्द आहे. विरोध होणे साहजिक
होते, वर्षानुवर्षे चालत आलेल्या रूढी, परंपरा असे अचानक बदलणे शक्यही नव्हते.
मध्यंतरी, या ऐकेविसाव्या शतकात, एका माजी मुख्यमंत्र्यांनी बलात्काराच्या घटना
रोखायला मुलींचे लग्नाचे वय कमी करण्याचा हास्यास्पद सल्ला दिला, पण कोणीही यावर
चकार शब्द काढला नाही, पण अचानक आलेल्या सुधारणेच्या वादळाला विरोध करणार्या
तत्कालिन ब्राह्मणांना मात्र अजुनही झोडपले जाते. तत्कालिनच नव्हे, तर या
आरोपावरून अजुनही संपूर्ण ब्राह्मणांना झोडपले जाते, वास्तविकता जाणुन बुजुन
दुर्लक्षित केल्या जाते. या समाज सुधारणेच्या काळात इंग्रजांनी केवळ बघ्याची
भुमिका घेतली. एक सती प्रथाविरोधी कायदा सोडला तर या स्थित्यंतरात ब्रिटिशांनी
तठस्थ भुमिका घेतल्याचीच दिसून येते. हा ब्राह्मण–ब्राह्मणेतर वाद त्यांच्या
पथ्यावर पडणाराच होता. धूर्त इंग्रज पूर्णपणे जाणुन होते, इंग्रजी शिक्षणामुळे जशी
ही सामाजिक जाणिव निर्माण झाली आहे, तशीच राजकीय स्वातंत्र्याची जाणीव पण निर्माण
होणार. ब्रिटिशांनी त्यांच्या पोतडीतले अजुन एक वेगळे अस्त्र बाहेर काढले, त्यात
आजपावेतो हिंदुस्थान होरपळतो आहे. ते अस्त्र म्हणजे ‘‘आर्य वंशवाद’’.
‘‘आर्य वंशवाद’’ हा अतिशय तिरपागडा सिध्दांत
मांडला गेला. जर्मन
पंडित मॅक्स मुल्लरने या आर्य सिद्धांताला मोठे बळ दिले. खरे तर त्याला
"आर्य" हा शब्द वंश म्हणुन वापरायचा नव्हता तर एक इंडो-युरोपियन भाषिक
गट म्हणुन वापरायचा होता. युरोपियन व संस्कृत भाषांतील काही साधर्म्यांवर आधारित
हा एकभाषिक लोकांच्या मुळस्थानाबद्दलचा सिद्धांत होता. हे इंडो-युरोपियन भाषा
बोलणारे कधीकाळी एका ठिकाणी वास्तव्यास असून पुढे ते भारत व युरोपात
टोळ्या-टोळ्यांनी पसरले असे या सिद्धांताचे मुख्य प्रतिपादन होते. या
सिद्धांतानुसार आर्य हे भारतावरील आद्य आक्रमक ठरत होते. ज्यांनी येथील जनतेला पराजित करुन गुलाम केले.
हे सर्व गुलाम म्हणजे आजचे शूद्र जातीय. ब्राह्मण हे आर्यवंशीय. आद्य आक्रमक. या
सिद्धांतामुळे एक मोठीच सामाजिक उलथापालथ झाली. हा सिद्धांत इंग्रजांच्या फारच
सोयीचा होता. या सिध्दांतावर आधारीत नवीन संघर्ष सुरु झाला. ब्राह्मण-ब्राह्मणेतर
वादाला जातीय नव्हे तर वांशिक परिमाण लाभले. आर्य वंशवाद हा सिद्धांत चुकीचा होता
खरे पण, जातीय अहंभाव ठीक होता असे एक वेळ म्हणता येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली. वांशिक अहंकारामुळे
जी एक विचित्र जातीय तेढ निर्माण झाली, त्यानी जाती निर्मुलन चळवळीची दिशाच बदलली.
बराचसा जातीअंताचा लढा वांशिक पायाकडे झुकल्याने जाती निर्मुलन चळवळीची व्याख्याही
बदलली. जातीनिर्मिती ही आक्रमक आर्य-ब्राह्मणांनी एतद्देशीयांवर निरंकुश सत्ता
गाजवण्यासाठीच केली असे प्रतिपादन अट्टाग्रहाने होवू लागले. याची परिणती
जातीनिर्मिती व तिचे व्यावहारिक वास्तव समजावून घेत होत, ती कशी नष्ट करता येईल,
इकडे प्रामुख्याने लक्ष जाण्याऐवजी ब्राह्मणद्वेषात झाली. आजही अनेक सामजद्रोही
याच संकल्पनेचा वापर ब्राह्मण विरोधाकरीता करीत असतात. जातीव्यवस्थेचे आकलन या
बनावट वंशसिद्धांताने ग्रासलेले आहे. त्यामुळे जातिसंस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोन
हाच मुळात जातविद्वेषावर (वंशविद्वेषावर) उभा ठाकल्याने त्या व्यवस्थेचे तटस्थ
आकलन करण्याचा कोणी प्रयत्नही करीत नाही व हा ब्राह्मण विरोध, स्व-जातीचा अहंभाव
हे वाढताना दिसते आहे.
या जातीय संघर्षाची धार स्वातंत्र्यलढ्यात
बरीचशी कमी झालेली दिसते. सर्व समाज जातजाणिवेच्या बाहेर निघुन भारतीय, हिंदु या
नात्याने एक होत या लढ्यात उतरली. मात्र, गांधीहत्येनंतर ब्राह्मण व्देषाशी उग्र
रूप धारण केले. या प्रचंड उद्रेकात असंख्य ब्राह्मण मारले गेले, लुटले गेले, देशोधडीला
लागले. ग्रामीण भागातून तर ब्राह्मण हद्दपारच झाला. मुळातच शांत, सहनशील असणारा ब्राह्मण यातूनही सावरला व पून्हा एकदा सुस्थितीत येवु
लागला. ‘आपण बरे नी आपले काम बरे’, या
मार्गाने जगु लागला. पण एक प्रकारची अलिप्तता, आत्मकेंद्रितता वाढीस लागली. वैदिक
परंपरेचा वारसा लाभलेला ब्राह्मण वर्ग मुळात शांत स्वभावाचा आहे. आक्रमकता असते ती
केवळ बौध्दिक वाद विवादात. सोशीक, सहनशील असलेला हा वर्ग
सामाजिकदृष्ट्या माघारला गेल्यानंतर याच्यात एक प्रकारची भयाची भावना निर्माण
झाली. या जिवघेण्या आघातानंतर ब्राह्मण बहुतांश शहरात स्थिरावला. मुख्यतः नोकरी
हेच उत्पनाचे साधन. शहरांमधून राहताना हळुहळु उंचावत जाणारे जीवनमान, बदलती जीवनशैली, त्यातून जागेची अडचण अशा
समस्यांमूळे एकत्र कुटुंब विभक्त होवु लागली. अपूरे उत्पन्न, वाढती महागाई, स्पर्धात्मक जीवन व त्याला तोंड
देण्यासाठी मुलांना द्यावे लागणारे महागडे शिक्षण यामुळे नवरा-बायको या दोघांनाही
नोकरी करणे भाग पडते. मुलांचे व्यवस्थित संगोपन व्हावे या उद्देशानी काटेकोरपणे
केलेले कुटुंब नियोजन, विभक्त कुटुंब यामुळे मुलांना ऐकटेपणा
यायला लागला. दिवसभर शैक्षणिक मारा तर संध्याकाळी संस्कार वर्ग, छंद वर्ग यातच तो गुरफटला गेला. मित्र मंडळात जाणे, एखाद्या
मंडळाचा सभासद होणे, काही सामाजिक कार्यक्रमात सहभागी होणे,
याला पालक आक्षेप घेतात. मुलगा बिघडेल, तो
बाहेर मारामारी करेल, अशा असंख्य समजूतीमधून पालक मुलांना
घरातच गुंतवून ठेवतात. ना मित्र, ना बहीण भाऊ, असे मुलं आपल्याच कोशात गुंतत जातात. एक अथवा दोन अपत्ये असल्यामुळे
त्यांचे सर्व लाड पूर्ण करणे, म्हणजे आपले कर्तव्य आहे या
(गैर) समजूतीतून पालक मुलांचे सर्व हट्ट पूर्ण करीत असतात. मुलांना तडजोड या
प्रकाराची ओळखच होत नाही. तसेच, घरात वडीलधारी मंडळी
नसल्यामुळे आपोआप होणार संस्कार मिळणे थांबले. मुलांच्या आर्थिक गरजा पूर्ण
केल्यानी आपले कर्तव्य संपले, या समाधानात पालक राहू लागले.
घरातील एकटेपणा, पुरवले जाणारे सर्व हट्ट, त्यामुळे तडजोड करण्याची मानसिकता नसलेला हा मुलगा / मुलगी तरूणपणी
बाहेरील जगात प्रवेश करतो त्यावेळी त्याच्यात बाहेरील जगाशी संघर्ष करण्याची
करण्याचा मानसिक कणखरपणा नसतो. तर मी म्हणेन ते होईलच ही ठाम (?) समजूत. पण बाहेरील परिस्थिती काय असते ? गांधी
हत्येनंतर पराकोटीला गेलेला ब्राह्मणव्देष काही प्रमाणात निवळला गेला. भारत-पाक
युध्द, त्या नंतर लागु झालेली आणिबाणी व या विरोधात जयप्रकाश नारायण यांनी
उभारलेले आंदोलन या सर्व घडामोडींमध्ये जातीय जाणीवा कमी झाल्या. याच आंदोलनात
जयप्रकाश नारायण सप्तक्रांतीची कल्पना मांडली. त्यातील एक क्रांती होती जाती विसर्जनाची.
‘जाती तोडो’ची. या संकल्पनेला व्यापक पाठींबा लाभला. जातजाणीव कम्र झाली असे वाटत
असतानाच एक आघात झाला. जातीपातीच्या सीमारेषा धूसर होत होत्या, जातीय व्देष निवळत होता. त्याच काळात व्हि.पी.सिंह यांनी भारतीय जनता
पक्षाच्या हिंदु कार्डला धक्का देण्यासाठी भयंकर राजकीय खेळी खेळली. मंडल आयोग
अहवालाचे जवळपास विस्मृतीत गेलेले प्रकरण त्यांनी पक्षीय, राजकीय
स्वार्थासाठी पुन्हा उकरून काढले. आरक्षणाच्या मुद्यावरून जातीपातींमधील व्देषाचे
भूत हिंदुस्थानी जनतेच्या मानगुटीवर पुन्हा एकदा बसवले. विसरत चाललेल्या जातींच्या
अस्मिता (?) पुन्हा जागृत झाल्या. जयप्रकाशजींना अभिप्रेत
असलेले जात विहीन समाज या संकल्पनेच्या अगदी विरुध्द स्थिती उत्पन्न झाली. जात ही
प्रत्येक भारतीयाची अटळ अशी ओळख बनली, कायदेशीर अट बनली. ही केवळ एक राजकीय खेळी न
ठरता अखंड हिंदुत्वाच्या मर्मस्थानावर केलेला भयंकर आघात ठरला. तमाम हिंदु
अद्यापही या आघातातून बाहेर पडलेला नाही. अखंड हिंदुत्वाकडे वाटचाल करत असलेला
समाज या आरक्षणाच्या आघातामूळे पुन्हा एकदा जाती-जातीत विखूरला गेला. राजकीय
पक्षांनादेखील हा नवा आधार मिळाला. जागतिकीकरण, खुली अर्थव्यवस्था, आर्थिक
उदारीकरणात राजकीय पक्षांना वेगळा असा कार्यक्रमच उरला नाही. एकमेकांपासून वेगळी
अशी सामाजिक, आर्थिक विचारसरणीच उरली नाही. काही पक्ष तर सरळ सरळ जातीच्या
आधारावरच निर्माण झाले. राजकीय नेते आपआपल्या जातीची संख्या दर्शवत आपल्या समाजाला
कशी आरक्षणाची आवश्यकता आहे हे दर्शवु लागले, शक्ती प्रदर्शन करून या आरक्षणात लाभ
मिळावा यासाठी मेळावे भरवू लागले. या मेळाव्यांमधून आपलाच समाज कसा मागास हे सांगु
लागले. प्रत्यक्षात या शक्ती प्रदर्शनातून या नेत्यांनी केवळ त्यांची खुर्ची पक्की
केली आणि समाज तोडण्याचे पाप केले. ‘जातीचे गणित’ खुलेपणानी बोलले जावु लागले आहे.
मध्यंतरी लष्करातदेखील आरक्षण असावे, अशी मागणी केली गेली. वास्तविक, लष्करात
हजारो पदे रिक्त आहेत. लष्कराच्या निकषांवर उतरणार्या प्रत्येक तरूणाचे स्वागतच
आहे, पण केवळ काही तरी मुद्दा काढायचा, याच नादातून ही नसती उठाठेव राजकीय पक्ष
करीत असतात. सध्या बढतीमधे आरक्षण असावे यासाठीचे विधेयक लोकसभेसमोर आहे. बढतीसठी
सेवाकाळ व कार्यक्षमता हे दोन निकष असतात. बढतीमधे आरक्षणाची मागणी करणार्या
नेत्यांना साधी ही जाणीव नाही, की अशी मागणी केल्यानी ते एकप्रकारे आपले समाजबांधव
कार्यक्षम नाहीत, हे दर्शवतात आहेत. हा सर्व समाजबांधवांचा धडधडतीत अपमान आहे.
संकल्पना - देशाची एकता
तोडण्याचे, अखंड हिंदुत्वाचे तुकडे पाडण्याचे, महापाप हे राजकीय नेते व पक्ष करीत आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर, जाती-पातीच्या राजकारणानी देश पोखरून निघत असताना, देशाला,
हिंदुत्वाला एकसंध करण्याची जबाबदारी प्रामुख्याने ब्राह्मणांवर येते. पुरातन
काळापासूनचा इतिहास आहे. ज्या ज्या वेळी हिंदुस्थानवर, हिंदु धर्माच्या मुळावर
उठणरे हल्ले झाले, त्या त्या वेळी तसे हल्ले परविण्यासाठी ब्राह्मणांनी पुढाकार
घेतला आहे, सक्रीय योगदान दिले आहे. अलेक्सझँडरच्या परकिय हल्ल्याची चाहूल घेत,
मौर्य साम्राज्य बलिष्ठ करीत त्याला टक्कर देणारे आर्य चाणक्य, शिवाजी महाराजांना
छत्रपतीपदाची अनिवार्यता पटवून देत छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक करणारे
गागाभट्ट, अहमदाशहा अब्दालीला स्वतः हौतात्म पत्करून जन्माची अद्दल घडवणारे पेशवे,
स्वातंत्र्य संग्रामाची ज्योत पेटवणारे मंगल पांडे, राजकीय स्वातंत्र्य मागणारे
लोकमान्य टिळक, समाजसुधारणेचा वसा घेतलेले आगरकर, महर्षी कर्वे, न्या.रानडे,
रमाबाई रानडे, चाफेकर बंधु, वासुदेव बळवंत फडके, स्वा. सावरकर असे असंख्य उदाहरणे
आहेत, जे या देशासाठी, हिंदुत्वासाठी पुढे सरसावले प्राणपणाने लढले. सद्यस्थितीतील
जातीआधारित राजकारण हिंदु धर्माच्या मुळावर उठु पाहात आहे, याला वेळीच आवर
घालण्यासाठी, विराट ब्रह्मशक्ती उभी करणे हे ‘‘ब्राह्मण जोडो अभियानचे’’ मुख्य
उद्दीष्ट आहे.
उद्दीष्ट – जातवार आरक्षण आणि जातीवर आधारित राजकारण या दोन प्रभावी
घटकांमुळे गेली दोन शतके भारतात आधुनिक मानसिकता तयार करण्याचे जे प्रयत्न झाले ते
धुळीला मिळाले. वाढती जातीय तेढ, प्रशासन
व्यवस्थेतील गोंधळ, वाढत चाललेली अराजकता, समाजातील वाढती संस्कारहीनता
थांबण्यासाठी विराट ब्रह्मशक्ती उभी करणे अत्यावश्यक आहे. जागतिकीकरणाच्या लाटेत
आजचा समाज आपल्या प्राचीन मुल्यव मुळ संस्कृतीपासून दुरावतो आहे. एकसंध ब्राह्मण
समाज या सर्व समस्यांवर सक्षमतेने, प्रभावी उपाययोजना करू शकतो. म्हणुनच
‘‘समाजनिर्मितीतून राष्ट्रनिर्मिती’’ या धोरणानूसार अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ‘‘
ब्राह्मण जोडो अभियान’’ हा प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर राबवित आहे. शाखा-उपशाखा,
प्रांत, भाषा, यात विखुरलेली ब्रह्मशक्ती एकत्रित, संघटित स्वरूपात राष्ट्रीय
पातळीवर उभी करणे व त्या माध्यामातून आजच्या समस्यांचे निराकरण करणे, हे या
प्रकल्पाचे ध्येय आहे. सक्षम पायाभूत सुविधा, नवीन रोजगार निर्मिती, नवीन उद्योग
सुरू करण्यासाठी सुलभ पध्दती, शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र बदल हे अपेक्षित असतना
राजकीय पक्ष केवळ जातीआधारित राजकारण करीत देशाला विनाशाकडे ढकलीत आहेत. स्वार्थी
राजकारणाकरीता जाती-जातीत तेढ निर्माण करून अखंड हिंदुत्वाला मुठमाती देण्याचे
राष्ट्रविघातक कार्य सुरू आहे, त्याला चोख उत्तर देण्याकरीता अखिल भारतीय ब्राह्मण
महासंघ कटिबध्द आहे.
संघटना - अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ
प्रामुख्यानी पाच स्तरावर कार्य करीत आहे. आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक
क्षेत्रात तर अ.भा.ब्राह्मण महासंघ कार्य करीत आहेच, परंतू आजपावेतो ब्राह्मणांनी
कटाक्षाने टाळलेल्या क्षेत्रात म्हणजेच राजकीय क्षेत्रातही अ.भा.ब्रा.म. कार्य
करीत आहे. त्या दृष्टीकोनातून नवे धोरणे बनवीत आहे. प्रत्यक्ष राजकारण प्रवेश न
करता ही राजकीय क्षेत्राच्या नाड्या हातात ठेवणे ब्राह्मणांसाठी अवघड नाही. केवळ
तशी इच्छाशक्ती हवी, तसे धोरण हवे. राजकीय क्षेत्रात दबदबा निर्माण करण्यासाठी
प्रत्यक्ष राजकीय क्षेत्रात न उतरता, केवळ आपली संघटित शक्ती उभी करणे व त्या
शक्तीचा योग्य वेळी प्रभावी वापर करणे, हे या योजनेत अपेक्षित आहे. तसा दृष्टीकोन
बदलणे आवश्यक आहे. अ.भा.ब्रा.म. याकरीता प्रयत्नशील आहे. शहरा-शहरातून लहान लहान
मंडळ, संघ अस्तित्वात आहेत. परंतू, त्यांचा परस्परांशी कोणताच संवाद नाही, वैचारिक
देवाण घेवाण नाही. त्यामुळे या शक्तीची दखल घेतल्या जात नाही. राष्ट्रीय पातळीवर
वावरताना ‘‘एक संघटन-एक नाव’’ या धोरणाने कार्य केल्यास त्याचा निश्चितच सकारात्मक
परिणाम दिसू शकतो. या संघटित शक्तीची दखल सर्वच पक्षांना, माध्यमांना घ्यावी
लागेल. किंबहुना, दखल घेणे भाग पडेल. तुकड्या तुकड्यात विखुरलेला, राष्ट्रीय
पातळीवरील सर्व ब्रह्मवृंद एक सुत्रात गुंफणे व त्याची संघटित शक्ती उभी करणे, हे
अतिशय आव्हानात्मक कार्य असून, यात सर्व ब्रह्मवृंदांचा मनःपूर्वक सक्रीय पाठिंबा
व सहकार्य अपेक्षित आहे.