Wednesday, 22 June 2011

ब्राम्हण एकता - माझे मत २

                               "ब्राम्हण एकता" ह्या विषयाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन वेगळा आहे. सगळे सहमत असतीलच असे नाही. मी फक्त माझा दृष्टीकोन मांडतो आहे. मागे मी ह्या विषयावर एक पोस्ट दिली आहे, ती Docs मध्ये बघता येईल.
                                आज  "ब्राम्हण एकता"  हा आपला मंच आहे, आपले उद्दिष्ट ब्राम्हण लोकं एकत्र येणे हा आहे, सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा राजकीय मंच नाही. आपल्याला ह्या मंचावर वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक विचारांची देवाण-घेवाण अपेक्षित आहे. तसे बघता आज आपल्या देशासमोर अनेक प्रश्न उभे आहेत, अश्या परीस्थितीत आपण फक्त "ब्राम्हण एकता"  हे का करतो आहोत? आपण एक नागरिक म्हणून का एकत्र येत नाही? आपण जातीआधारित ग्रुप स्थापन करून फुट पाडतो आहोत का? इतर जाती ,पंथ,धर्म ह्यांना दूर करतो आहोत का? असेही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ह्याचे उत्तर ठामपणे "नाही" हेच आहे. आपण जो ग्रुप स्थापन केला आहे, तो कुणाला विरोध म्हणून नाही, किंवा आपल्या काही मागण्या मान्य करून घेण्यासाठी नाही, आपला सरळ साधा उद्देश ब्राम्हण समाजानी एकत्र येणे एव्हढाच आहे. आपले "सक्षमीकरण" हे आपले उद्दिष्ट आहे. "विरोध" हा आपला पाया नाही. आपली "एकता" हा आपला पाया आहे.
                                  "ब्राम्हण एकता" ह्याकडे थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून बघितले तर खूप चांगले आशादायक चित्र उभे राहते. जसे मी आधीच्या पोस्टमध्ये म्हटले होते कि आज आपण मराठी भाषिक ब्राम्हण एकत्र येवू  आणि नंतर हळू हळू इतरांनाही सामील करत जाऊ आणि सामाजिक समरसतेतून एकात्मिक भारताची पायाभरणी करू. हे कितपत शक्य आहे, ह्याला किती वेळ लागेल हा प्रश्न आहे पण त्या दृष्टीनी आपण सुरुवात तर करू शकतो, तेच आपल्याला करायचे आहे, आपल्यातील एकजूटता विरोधासाठी नाही तर आपली ताकत वाढवण्यासाठी करायची आहे.
                                       असा व्यापक दृष्टीकोन ठेऊन आपल्याला एकत्रीकरण करायचे आहे. आपला सध्याचा उद्देश अगदी साधा आहे, तो म्हणजे मराठी भाषिक ब्राम्हणांचे वैचारिक, सांस्कृतिक एकत्रीकरण. त्यासाठी अगदी साधा निकष आपण ठेवला आहे तो म्हणजे " मराठी भाषिक ब्राम्हण".  ब्राम्हण समाजातील शाखा, उप-शाखा, त्यांची जीवनपद्धती, खाद्य-संस्कृती, त्यांची प्रादेशिक स्थिती, भौगोलिक सीमा आदी बाबी निकष ठेवणे व्यावहारिक ठरणार नाहीत. "मराठी भाषिक ब्राम्हण" हे ध्येय असल्यामुळे एखादी शाखा, त्यांची खाद्द्य-संस्कृती ह्यावर आक्षेप योग्य वाटत नाही. मला ह्याबाबतीत आपल्या मित्रांचे तीव्र मतं पूर्णपणे माहिती आहेत. पण आजची वास्तविक परिस्थिती बघता काही प्रश्न उपस्थित होतात. आपल्याला "ब्राम्हण" म्हणजे नेमके काय अपेक्षित आहे?  रुढीप्रिय, पारंपारिक, कर्मठ ब्राम्हण ? ज्याचा इतर समाजाशी खूप कमी संपर्क असेल, जो आपल्याच कोशात असेल. पूर्वी ज्या कारणामुळे आपला समाज इतर समाजापासून दुरावला होता.आपल्या रूढीप्रियतेनी, कर्मठ वागणुकीने आपल्याच बांधवांना आपण बहिष्कृत  केले, त्यांना दुसरा धर्म स्वीकारावा लागला, आज आपणही तसेच वागायचे का ? सगळ्यात महत्वाचे कि जसे "ब्राम्हणत्व" अपेक्षित आहे ते आजच्या काळात व्यावहारिक आहे का? तेवढा वेळ आज आपल्याकडे आहे का ? आणि समजा तसे वागलोही तर आजच्या जगाच्या प्रवाहापासून आपण बाहेर फेकले जाणार नाही का ? आज आपले अस्तित्व टिकवण्याच्या प्रयत्नात आपणच प्रवाहातून बाहेर फेकले जाणार नाही याची ही काळजी घ्यावी लागेल.
                                    माझ्या ह्या विचारावर अनेक आक्षेप येणार याची मला कल्पना आहे. शाकाहार-मांसाहार, धार्मिक आचरण, वैदिक वारसा, quantity-quality असे मुद्दे येणार आहेत, पण हे सगळे ह्या एकाच पोस्टमध्ये सामावणे शक्य नाही. जसे जसे मुद्दे येतील तसा आपण विचार करत राहू. माझी अपेक्षा एवढीच आहे कि, "ब्राम्हण एकता" हा मुद्दा विचारात घेताना आपली मुलभूत तत्वे न सोडता वर्तमानात आपण प्रगती कशी करू ? ह्यावर विचार व्हावा.  "ब्राम्हणत्व" हा विचार करताना वर्तमानातील "सत्य" स्वीकारावे लागेल. आपल्या समाजातील "आज" आणि  "उद्या" ह्या दृष्टीनी विचार व्हावा, "काल" थोडा बाजूला ठेवावा लागेल. संपूर्ण ब्राम्हण समाजाचे एकत्रीकरण हे ध्येय असल्यामुळे लवचिकता ठेवावी लागेल.
                                     हा माझा विचार आहे, निर्णय नाही. ह्यावर चर्चा अपेक्षित आहे, विरोधही अपेक्षित आहेच. आपले मत मुद्देसूद असल्यास चर्चा करणे अधिक सोयीचे राहील. धन्यवाद !!!                                

1 comment:

  1. अतिशय सुंदर किहिले आहे , काहीही कमी करण्याची गरज नाही . एकदम मस्त.

    ReplyDelete